सातपूर विभागातील खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठकीत बोलतांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Girish Mahajan : वाझे, मुंढेंसह देशमुखांची देखील नार्को टेस्ट करा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्वत:ला वाचविण्यासाठी अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत असून, सचिन वाझे, प्रवीण मुंढे यांच्यासह अनिल देशमुखांची नार्को टेस्ट करा, 'दूध का दूध पानी का पानी' होईल, असे आव्हान भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी देताना सर्वेक्षणाच्या अहवालाबरोबरच कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. वशिल्याने उमेदवारी दिली जाणार नाही. त्यामुळे गटबाजी न करता, आपापसातील वादविवाद मिटवा. निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असे आवाहनही महाजन यांनी यावेळी केले.

नाशिक : भाजपाच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सातपूर विभागातील खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ताकही फुंकून पिण्याची भूमिका घ्यावी लागणार

महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी सहा जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ताकही फुंकून पिण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमदेवारी जाहीर करताना पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याचे मतही विचारात घेतले जाईल. उमेदवारीसाठी आपापसात स्पर्धा न करता एकजुटीने पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही महाजन यांनी केले. माझ्यावर खोटे आरोप करून जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले. मला जेलमध्ये टाकून फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता. हे सगळे रेकॉर्डवर असून, यासाठी जळगावच्या जिल्हा पोलिस अधीक्षकावर दबाव टाकला गेला. माझ्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करताना, आता अनिल देशमुख स्वत:च अडकले आहेत. वाझे यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे देशमुख आता फडणवीस यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत, असा दावा महाजन यांनी केला. यावेळी व्यासपीठावर संघटक रवि अनासपुरे, आमदार डॉ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही महाजन प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या भाषणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. आता तर त्यांची मला चिंता वाटू लागली आहे, असा उपरोधिक टोलाही महाजन यांनी लगावला. राजकारण करायचे असेल, तर आखाड्यात या असे आव्हान देतानाच, अमित शाहांना उद्धव ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही महाजन यांनी सांगितले.

खोटे नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांना धडा शिकवा

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह सेट करून मुस्लीम, दलित समाजाची दिशाभूल केली. परंतु बेडूक कितीही फुगला, तरी बैल होत नाही, अशा शब्दांत टीका करत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवा. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळवून द्या. या माध्यमातून राजकीय फायदा घ्यायचाच आहे. पण, हे करताना प्रत्येकाच्या घरी गेलेच पाहिजे, असे आवाहनही महाजन यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT