Girish Mahajan Pudhari
नाशिक

Girish Mahajan | ठाकरे-पवार गटाला आंदोलनासाठी माणसेच मिळत नाहीत, 'नीट' आंदोलनावरून मंत्री महाजनांचा हल्लाबोल

Girish Mahajan | 'नीट' आंदोलनावरून मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला; ठाकरे-पवार गटाला आंदोलनासाठी माणसेच मिळत नाहीत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नीट पेपरफुटीप्रकरणी नवी दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला आंदोलनासाठी माणसेच मिळत नसल्यामुळे कुठेही आंदोलन झाले की, या पक्षाचे कार्यकर्ते तिथे जाऊन गर्दी करतात, अशी खोचक टीका भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

येथे सोमवारी (दि. २०) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिल्लीतील आंदोलन, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील फोटो व्हायरल प्रकरणावरही भूमिका स्पष्ट केली. दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले की, दिल्लीत नेमके काय घडले, आंदोलकांची संख्या किती होती किंवा लाठीमार झाला की नाही, याबाबत मला माहिती नाही.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली का, हा तपासाचा विषय आहे. याकडे दिल्लीतील वरिष्ठ नेते लक्ष देत आहेत. दिल्लीतील आंदोलनात शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, या दोन्ही पक्षांकडे आता स्वतःची आंदोलने करण्यासाठीही माणसे उरलेली नाहीत.

आंदोलनांचा मोठा गाजावाजा केला जातो; मात्र प्रत्यक्षात त्यांना प्रतिसाद मिळत नाही. ठाकरे गटाचे तर राजकीय अस्तित्वच उरलेले नाही आणि अनुयायीही कमी झाले आहेत, अशी टीकाही मंत्री महाजन यांनी केली. यावेळी सोशल मीडियावर आपले फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहितीही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

एकनाथ खडसे यांना शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारला असता महाजन यांनी नकार दिला. 'त्या दिवशी महत्त्वाच्या कामानिमित्त मी बाहेर असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. मात्र खडसे यांना मनःपूर्वक शुभेच्छा आहेत. त्यांनी शंभर वर्षे पूर्ण करावीत आणि त्यांच्या हस्ते आणखी चांगले कार्य घडावे, हीच सदच्छा,' असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT