नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने सध्या तात्पुरती उपाययोजना करण्यात येत असून, यापुढील काळात नदीत सांडपाणी सोडले जाणार नाही, अशी व्यवस्था सीव्हर लाइन व एसटीपी प्रकल्पाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. तसेच ध्वजारोहण सोहळ्यापर्यंत शहरात उघड्या गटारांचे दृश्य दिसणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीसंदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेदाम, आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भक्ती चरणदास महाराज आणि उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थाच्या औपचारिक प्रारंभानिमित्त शनिवार (दि. ३१) रोजी रामकुंड येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यासाठी रामकुंड परिसरात तसेच सायंकाळी गोदावरी आरतीसाठी सुमारे एक लाख भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
आगामी सिंहस्थात भाविकांच्या गर्दीचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले जातील, असा अंदाज पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केला. साधुग्रामचे काम वेळेत पूर्ण होणार : सिंहस्थासाठी साधुग्राम उभारणीचे काम अद्याप सुरूच असल्याने साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर बोलताना महाजन यांनी कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले.
दुष्काळात कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र पाणी नाही: जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना कुंभमेळ्यासाठी स्वतंत्रपणे पाणी सोडले जाणार नाही, मात्र पिण्याच्या पाण्यासाठी तसेच एकलहुरे औषंगिक विद्युत केंद्राचीही पाण्याची मागणी असून, दरवर्षीच्या पद्धतीनुसार मागणीच्या आधारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल, असे सांगितले.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित शाळांनी निर्णय घ्यावा, असे महाजन यांनी स्पष्ट केले.