Sunil Kedar Resignation Girish Mahajan  
नाशिक

Nashik Sunil Kedar Resignation Girish Mahajan |सुनील केदारांचा राजीनामा घेतल्याची महाजनांची कबुली

सुनील केदारांचा राजीनामा घेतल्याची महाजनांची कबुली, पक्षाकडून अद्याप कारवाई झालेली नसल्याचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्वीकृत महापालिकेतील सदस्यांची नावे जाहीर करताना, पक्षाच्या संघटनात्मक प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याच्या वृत्ताला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. २७) दुजोरा दिला. प्रदेशाध्यक्षांची पूर्वपरवानगी न घेता, स्वीकृत सदस्यांची यादी जाहीर केल्यामुळे चव्हाण नाराज झाले. त्यातूनच केदार यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. मात्र, राजीनामा घेतला असला, तरी केदार यांच्यावर अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वीकृत नगरसेवकपदाच्या १० पैकी भाजपच्या वाट्याला आलेल्या सहा जागांसाठी ३०० हून अधिक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. या निवडीसाठी राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू होते. शहराध्यक्ष सुनील केदार हे स्वतः देखील स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. दरम्यान, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी आणि रामहरी संभेराव यांची नावे भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी निश्चित केली गेली.

भाजप प्रोटोकॉलनुसार स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यापूर्वी प्रदेशाध्यक्षांची संमती घेणे आवश्यक असते. त्यानंतरच अंतिम यादी जाहीर करण्याची प्रक्रिया अपेक्षित असते, तसे न करता, केदार यांनी नावे जाहीर केल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण नाराज झाले. परिणामी, त्यांनी केदार यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रथम केदारांबाबत निर्णय, त्यानंतर नवीन अध्यक्ष

गिरीश महाजन म्हणाले की, त्यांचा राजीनामा घेण्यात आला असला, तरी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. आधी जुन्या शहराध्यक्षां-बाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर नवीन शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होईल. या वक्तव्यामुळे केदार यांचे शहराध्यक्षपद अनिश्चिततेत आले असून, पक्षाच्या संघटनात्मक वर्तुळात ते नामधारी अध्यक्ष राहण्याची शक्यता आहे.

निष्ठावंतांनाच स्वीकृत नगरसेवकपदाची संधी

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनाही महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. निवड झालेल्या सहा सदस्यांमध्ये एकही उद्योगपती, व्यापारी नसून, संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ४० वर्षापासून पक्षसंघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन न्याय दिल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT