नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अजून ४० दिवस बाकी आहेत. नवीन घाट आणि कुंडांचे काम वेगाने सुरू असले, तरी काही ठिकाणी मंथन/संतथपणा दिसत आहे. आता ठेकेदारांना रागावावे लागणार आहे. येत्या २० ते २२ दिवसांत सर्व घाट आणि इतर सर्व कामे पूर्ण करण्याचे कडक आदेश प्रशासनाला व ठेकेदारांना दिले आहेत. यात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ठेकेदारांना दिला.
मंत्री महाजन यांनी रविवारी (दि. २०) कुंभमेळा कामांची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सिंहस्थकामांच्या संतगतीने सुरू असलेल्या कामांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण होऊन कुंभमेळ्याचा भव्य प्रारंभ होणार आहे.
त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. या ऐतिहासिक क्षणी देशाच्या राष्ट्रपती महोदयांची विशेष उपस्थिती असणार असून, ध्वजारोहणानंतर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून साधू-संत मोठ्या संख्येने दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास ४० दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. नवीन घाट आणि कुंडांचे काम वेगाने सुरू असले, तरी काही ठिकाणी संतथपणा दिसत आहे. येत्या २० ते २२ दिवसांत सर्व घाट आणि इतर सर्व कामे पूर्ण करण्याचे कडक आदेश प्रशासनाला व ठेकेदारांना दिल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पीक परिस्थितीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पीक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत.
५ ऑक्टोबरची वाट न बघता तातडीने मदत देण्याच्या विरोधकांच्या मागणीवर निशाणा साधत ते म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मागच्या वर्षीही आमच्या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली होती. जे आज आम्हाला सल्ले देत आहेत, त्यांनी आधी स्वतःच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले हे तपासून बघावे, असा टोला त्यांनी विरोधकांना लावला.
जवाहर पर्यटन स्थळावरील पर्यटकांवरील मारहाणीच्या घटनेवर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, १०-१२ लोकांनी एकत्र येऊन २-३ पर्यटकांना अमानुष मारहाण करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वी इगतपुरी येथे असा प्रकार घडला, तेव्हा आम्ही आरोपींना अटक करून कित्येक दिवस जेलमध्ये सडवले होते.
जवाहर प्रकरणातही दोषींवर अतिशय कठोर कारवाई होईल. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. पर्यटन स्थळांवर अतिरिक्त पोलिस तैनात केले जातील. त्या गावगुंड पोरांना ताब्यात घेऊन त्यांची मस्ती जिरवली जाईल. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी पोलिस प्रशासन घेईल, असे त्यांनी सांगितले.