Nashik Kumbh Mela 2026 
नाशिक

Ghoti Trimbakeshwar Highway | घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गाचा मार्ग मोकळा! बाधित शेतकऱ्यांना मिळणार जमिनीचा चारपट मोबदला

Ghoti Trimbakeshwar Highway | मंत्री बावनकुळे : घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

घोटी - त्र्यंबकेश्वर महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, शेतकरी कृती समिती आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्याघोटी - त्र्यंबकेश्वर यामार्गाचे चौपदरीकरण व त्यासाठी रुंदीकरण कामी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेविरोधात येथील स्थानिक शेतकारी आक्रमक झाले होते.

मात्र, आमदार हिरामण खोसकर यांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तसेच भूसंपदान प्रक्रियेसंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यानुसार आमदार खोसकर यांनी मध्यस्थी करून बुधवारी (दि. ८) मंत्रालयातील महसूलमंत्री बावनकुळे यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. घोटी - त्र्यंबकेश्वर हा प्रस्तावित रस्ता असून, आतापर्यंत भूसंपादन झालेले नाही.

मात्र, आता भूसंपादनासाठी जागेचे मोजमाप करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची समिती असेल. महामार्गालगतच्या वाड्या-वस्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समिती स्थापना करून अहवाल पाठविणे. तसेच कोणत्याही बाधित शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही यांची काळजी घ्यावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

तसेच महसूलमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भूसंपादन अधिकारी रवींद्र भारदे, महामार्गाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला. बैठकीस शेतकरी कृती समिती अध्यक्ष नागेश गायकर, सचिव गोरख वाजे, अरुण पोरजे, क्षीरसागर, किसन गायकर, किसन जाधव, महादू गायकर, गोविंद खकाळे, बाजीराव तांबे, अंकुश महाले, अक्षय भोर, भारत बरकुले, घनश्याम परदेशी आदी शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत झालेले निर्णय

या बैठकीत घोटी त्र्यंबकेश्वर महामार्गावरील घरे, झाडे, विहिरी, दुकाने, पोल्ट्री फार्म, शेड नेट बाधित होणार, त्यांना योग्य मोबदला अदा करण्यात येईल. घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामात ज्या जमिनी जाणार आहेत, त्यांना सरकारी मूल्याच्या चारपटीने दर देण्यात येईल. जिथे ज्या तीन शिवारामध्ये जास्त रेडीरेकनर दर आहे, त्याचा मध्य काढून तो चारपटचा दर निश्चित करण्यात येईल. हॅपी होम प्रोजेक्ट केसचा आधार घेऊन जमिनीच्या मोबदल्यासाठी २० टक्के कपात करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

घोटी - त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० अ या रस्त्यासाठी वाधित होत असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी शेतकरी कृती समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी भक्कमपणे कायम उभी राहील.
- नागेश गायकर, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT