नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'अभ्यासिकेत सडून मरण्यापेक्षा चळवळीत लढून मरू...', 'विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा...', 'मटक्याचे आकडे फुटत नाहीत मग, एमपीएससीचा पेपर कसा फुटतो?', 'मेहनत आमची नोकरी आमची दलाली नको, पारदर्शकता हवी' अशा आशयाचे फलक घेऊन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. ९) आक्रोश व्यक्त केला.
एमपीएससी परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटी आणि गैरकारभाराच्या प्रकारांमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. बुधवारी (दि. ९) नाशिकमधील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीही आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरले. शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत दोन तास धरणे निदर्शने केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आयोगाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. 'अध्यक्ष हटाव, एमपीएससी बचाव' अशा घोषणा देत विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास उडाला असल्यामुळे अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
एमपीएससीच्या सर्व परीक्षा पद्धतींमध्ये पूर्ण पारदर्शकता आणावी, आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर येऊन त्यांच्या अडचणी सोडवाव्यात आणि परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी आंदोलक गौरव आघाव यांनी यावेळी केली. तसेच शासनाने आणि आयोगाने लवकरात लवकर ठोस निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात गौरव आघाव, धीरज पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, विनायक देवरे, अनिकेत गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सहभागी झाले होते.
ज्या 'ऋतुजा' नावाच्या विद्यार्थिनीमुळे एमपीएससीतील संशयास्पद चॅट आणि पेपरफुटीचे रॅकेट उघडकीस आले, तिचे आभार मानणारा 'थँक्स ऋतुजा' हा फलक आंदोलनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. व्यवस्थेतील कीड बाहेर काढणाऱ्या त्या धाडसी विद्यार्थिनीप्रती आंदोलकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोर झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढत, रोष व्यक्त करीत संतप्त भावना व्यक्त केल्या.