नाशिक : खुशी गोराडे
रक्षाबंधनाला काही दिवस शिल्लक असताना राखी बाजारात लगबग वाढली आहे. विविध रंग आणि डिझाइन्सच्या राख्यांनी स्टॉल्स सजले आहेत. यंदाही बाजारात चंदन राखी, स्टोन राखी आणि भैया भाभी राख्यांसह अनेक प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात राख्यांची किंमत १० पासून १०० रुपयांपर्यंत असली, तरी ग्राहक १० ते ३० रुपयांपर्यंतच्या राख्यांना पसंती देत आहेत. विशेष म्हणजे नवीन पिढी (जेन झी) इव्हिल आय, मूड कफ्स, पॉप-कल्चर राख्यांना पसंती देत आहे.
बाजारातील काही स्टॉल जुन्या पद्धतीच्या मोठ्या आकाराच्या राख्याही पाहायला मिळत आहेत. फॅन्सी डिझाइन्सबरोबरच साध्या आणि सुंदर कॉटन धाग्याच्या राख्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. फॅन्सी आणि आकर्षक डिझाइन्स बरोबरच बाजारात काही मोठ्या आकाराच्या जुन्या पद्धतीच्या राख्याही पाहायला मिळत आहेत
'जेन झी'मुळे ट्रेंडमध्ये बदल
तरुण ग्राहकांकडून डिझाइनला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. काही जण मोबाइलमधील डिझाइनचा फोटो दाखवून यासारखी राखी आहे का, अशी विचारणा करीत आहेत. यंदा 'इव्हिल आय' आणि संरक्षणचिन्हे, मूड कफ्स व शब्दांची कलाकुसर, पॉप -कल्चरवरील व्यक्तिरेखा आणि नॉस्टॅल्जिक डिझाइन्स लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावरील ट्रेंडचाही परिणाम तरुणांच्या पसंतीवर होत आहे. इन्स्टाग्राम, रील्सच्या माध्यमांवर नवीन कल्पना मिळत आहेत. काही तरुणी स्वतः राखी तयार करीत भावनिक जोड देण्यास महत्त्व देत आहेत.
पूर्वीसारखे राख्यांचे प्रकार आता पाहायला मिळत नाहीत. डिझाइन आणि लोकांची पसंती बदलली आहे, तरी राखीचे महत्त्व कायम आहे.
- कल्पना दुकळे, शिक्षिका, येवला
तयार राखी घेण्याऐवजी यावर्षी स्वतः राखी तयार करणार आहे. त्यात माझ्या भावना आणि आशीर्वाद असावेत, असे मला वाटते.
- मीतल मुटके, विद्यार्थिनी, सिन्नर
रक्षाबंधन जवळ येत असल्याने बाजारातील 66 खरेदी आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. यंदाचा सण आणि विक्री दोन्ही चांगले जातील, अशी आशा आहे.
- भरत प्रजापती, विक्रेता, नाशिक
मला स्टायलिश राख्या आवडतात. सुंदर दिसणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर नवीन डिझाइन्स आणि कल्पना मिळतात.
- समीक्षा साताळकर, विद्यार्थिनी, नाशिक
माझ्यासाठी रक्षाबंधन हा केवळ सण नाही. बहिणीसाठी एखादी आठवण तयार करणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. ट्रेंडी आणि कस्टमाइज्ड राख्या मला आवडतात.
- मनन भावसार, विद्यार्थी, नाशिक