भीषण स्फोट Pudhari
नाशिक

Gas Cylinder Blast Satpur | सातपूरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! 36 वर्षीय महिला गंभीर जखमी, श्रमिकनगर हादरले

Gas Cylinder Blast Satpur | सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील गंगासागर नगरमध्ये सोमवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील गंगासागर नगरमध्ये सोमवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ३६ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनाली रवींद्र साळवे (३६) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. श्रमिकनगर येथील गंगासागर नगरमध्ये दुपारी सोनाली साळवे या स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होत्या. याचवेळी अचानक गॅसगळती झाल्याने सिलिंडरमध्ये स्फोट झाला.

स्फोट इतका भीषण होता की, त्यानंतर काही क्षणातच घरातील कपडे, फर्निचर व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. स्फोटाचा आवाज मोठा असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाला माहिती दिली आणि मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातील किचन आणि हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती.

जवानांनी तत्परतेने घरात प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे, घरात असलेले इतर गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढण्यात आल्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नगरसेवक दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

प्राथमिक तपासात गॅसगळतीमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गॅस सिलिंडर वापरताना गळती होत असल्यास तत्काळ खबरदारी घ्यावी, रेग्युलेटर व पाइप नियमित तपासावा आणि कोणतीही शंका असल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT