नाशिक : दर्जेदार कलाकृतींनी घरात, वास्तूमध्ये आनंदी प्रसन्न वातावरण निर्मिती होते. उत्तम चित्रे, कलेव्दारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मन प्रसन्न, प्रफुल्लित होऊन जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन संचालिका स्नेहल अहिरे यांनी केले. गारो या नवीन कलादालनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
समर्थनगर येथे गारो कलादालनाचे शनिवारी ( दि.२ ) उद्घाटन करण्यात आले. पूर्वा देवकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. संचालिका स्नेहल अहिरे म्हणाल्या, भारत अत्यंत कलासंपन्न देश आहे. नाशिक ही कलाभूमी असून येथील मातीला अनेकांच्या कलेचा स्पर्श झालेला आहे. दर्जेदार तरुण कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गारो कलादालन सुरु करण्यात आले आहे. येथे नाशिकसह भारतातील विविध दर्जेदार चित्रे, कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. असे त्यांनी नमूद केले. राहूल अहिरे व अमित देवकर म्हणाले, प्रवेश केल्यापासून रसिकांना कलात्मक अनुभूती मिळेल. येथे विविध उपक्रम, कार्यशाळा, यांचे आयोजन केले जातील. अनेक चित्रकार, कलाकारांना सामावून घेण्याची योजना आहे असे त्यांनी सांगितले. नाशिककर कलारसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनात वैशाली कदम यांची मातीची सुंदर भांडी आहेत. आनंद देसले यांनी रंगवलेले दुपट्टे, साड्या आहेत. नाशिकचे सागर गायकवाड यांची निसर्गचित्रे व रोहित सरोदे यांनी चारकोल माध्यमात रंगवलेले चित्र गोदाघाट लक्षवेधी आहे. विकास सावंत यांचे गौ - क्राफ्ट, परेश देशपांडे यांच्या सिरॅमिक कलाकृती, मयूर सतूटे यांची कॅलिग्राफी व विजय काळे, मधुरा देशपांडे, हर्षदा राठी, गायत्री कोळी यांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. केरळमधील 'म्युरल्स', लाकडी कोरीवकाम, कोलकाता, ओरिसा येथील 'ढोकरा' शिल्प व 'टेराकोटा' कला येथे बघता येणार आहेत.