नाशिक : जिल्ह्यातील धरणसाठ्यांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, यात गोदावरी खोऱ्यातील धरणसमूहात गतवर्षाच्या तुलनेत तब्बल २३ टक्के जलसाठ्याची तूट निर्माण झाली असून, पालखेड समूहतील धरणांनी तळ गाठला आहे. तर गिरणा खोरे धरणसमूहात तब्बल ४२.२८ टक्के तूट दिसून येत आहे. त्यामुळेच जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर आता जुलै महिन्यात नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव दिसून येत असून, नाशिक शहर व परिसरात यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गंगापूर धरणसमूहात गतवर्षाच्या तुलनेत तब्बल २३ टक्के जलसाठ्याची तूट निर्माण झाली आहे.
गतवर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस जून महिन्यातही कायम राहिल्याने गंगापूर धरणसमूहात सुमारे ५९.५६ टक्के जलसाठा होता. तुलनेत यावर्षी जून अखेरपर्यंत केवळ ३६.०३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यात गंगापूर धरणात ३१.८३ टक्के, कश्यपी २३.८७, आळंदी ५.१५ टक्के भरले आहे. तर मुकणे धरणात गतवर्षी जून अखेर ५८.१७ टक्के जलसाठा होता. तर यावर्षी आतापर्यंत केवळ १८.४६ टक्के धरण भरले असून नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात अवघ्या ५३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून अखेर जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने नाशिकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून गत दोन दिवसांत जिल्ह्यात सुमारे ७ मिमीहून अधिक पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे ६१.१ मिमी
घाटमाथ्यावर मान्सूनचा प्रभाव
दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अद्याप मान्सूनचा प्रभाव प्रामुख्याने घाटमाथ्यावरच दिसून येत आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये दिलासादायक पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे या भागातील खरिपाच्या शेती कामानांही वेग आला आहे.