अन्न, औषध प्रशासन pudhari file photo
नाशिक

नाशिक गणेशोत्सव 2024 : गणेश मंडळाचा अन्न प्रशासनाला ठेंगा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून भाविकांंना वितरीत केला जाणाऱ्या महाप्रसादासाठी अन्न, औषध प्रशासनाचा ऑनलाइन पद्धतीने परवाना घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने मंडळांना आवाहन केले होते. मात्र, अन्न प्रशासनाच्या या आवाहनाला गणेश मंडळांनी ठेंगा दाखविला आहे. गणेशोत्सवाच्या आठव्या दिवसापर्यंत एकाही मंडळाने ऑनलाइन पद्धतीने परवाना घेतला नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

भाविकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वीच गणेश मंडळांना सूचना दिल्या होत्या. त्यात महाप्रसाद बनविणे तथा वितरणासाठी आॅनलाइन पद्धतीने अन्न परवाना घेवूनच महाप्रसादाचे वितरण करण्याबाबतचे स्पष्ट केले होते. तसेच महाप्रसाद स्वच्छ व आरोग्यदायी जागेत तयार करावा, कच्चे अन्नपदार्थ खरेदीचे बिल जतन करून ठेवावे, ताज्या कच्या अन्नपदार्थांचाच महाप्रसाद तयार करावा, महाप्रसाद तयार करताना दूध व दुग्धजन्य या विषबाधा होवू शकेल, अशा पदार्थांचा अंतर्भाव करू नये, महाप्रसादासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा आदी स्वरुपाच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांचा एकाही मंडळाने गंभीरपणे विचार केला नसल्याचे दिसून येत आहे.

शहरात ६१३, जिल्ह्यात १७५९ मंडळे

शहरात महापालिकेकडून परवाना घेतलेले तब्बल ६१३ मंडळे असून, जिल्ह्यात ५८८ मोठे, तर ११७१ छोटे असे एकूण १७५९ मंडळांची पोलिस प्रशासनाकडे नोंद आहे. मात्र, यातील एकाही मंडळाने महाप्रसाद वितरणाबाबत अन्न प्रशासनाकडून परवाना घेण्यासाठी अर्ज केलेला नाही.

प्रशासनाचे जिल्ह्यात चार विभाग

गणेशोत्सव काळात शहरासह जिल्ह्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईसाठी चार विभाग तयार केले आहेत. प्रत्येक विभागावर अधिकारी आणि निरीक्षकांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, इगतपूरी आणि चांदवड हा एक विभाग तर दुसऱ्या विभागात मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सटाणा, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, देवळा आणि नाशिक तालुका असा दुसरा विभाग करण्यात आला आहे. तर शहरात नाशिकरोड, सिडको, पंचवटी एक विभाग तर गंगापूर, सातपूर हा दुसरा विभाग असून, यातील एकाही विभागाकडून परवान्यासाठी अर्ज प्राप्त झाला नाही.

प्रशासनाला तक्रारींची प्रतीक्षा

एकाही गणेश मंडळाने परवान्यासाठी अर्ज केला नसला तरी, अन्न प्रशासन हातावर हात ठेवून असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांच्या मते, तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच कारवाईचा विचार केला जाईल. गणेशोत्सव काळात प्रशासनाने अवघे सहाच नमुने घेतले असून, व्यापक स्वरुपात मोहीम राबविली जात असल्याचा केवळ कांगावा प्रशासनाकडून केला जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

शहरासह जिल्ह्यातून एकाही गणेश मंडळाने महाप्रसाद वितरणाच्या परवान्यासाठी आॅनलाइन अर्ज केलेला नाही. मात्र, याबाबत महाप्रसादातून अप्रिय घटनेबाबत माहिती मिळाल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
उदय लोहकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT