नाशिक : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला सुरुवात केली असून, येत्या ७ ऑगस्टला गणेशमूर्ती विक्री स्टॉल जागेची लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. यंदा शहरातील २४ ठिकाणी तब्बल २७४ स्टॉल्स उभारले जाणार आहेत.
यंदा २७ ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून गणेश आरास केली जाते. यासाठी मंडप, कमानी उभारण्यासह विविध परवानग्यांकरिता महापालिकेने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यासाठी विभागीय कार्यालय स्तरांवर एक खिडकी योजना राबविली जात आहे, तर गणेश मूर्ती विक्रीसाठी येत्या ७ ऑगस्टला दुपारी २.३० वाजता सहाही विभागीय कार्यालयांच्या स्तरावर स्टॉल्सच्या जागांकरिता लिलाव केले जाणार आहेत. प्रथम लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यास लगेच दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी २.३० वाजता विभागीय कार्यालयांमध्येच लिलाव घेण्यात येतील. यंदा सहाही विभागांमध्ये तब्बल २७४ गणेशमूर्ती स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. यात सर्वाधिक १०५ स्टॉल्स नाशिकरोड विभागात उभारले जाणार आहेत.
गणेश मूर्ती विक्री स्टॉल्सच्या लिलावात भाग घेणाऱ्यांना प्रत्येक स्टॉलच्या जागेसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच रहिवासी पुराव्यासह ओळखपत्राची (आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, लाइटबिल, बँक पासबुक) छायांकित दोन साक्षांकित सादर करावी लागणार आहे.
विभाग - स्टॉल्सची संख्या
नाशिक पूर्व - १४
नाशिक पश्चिम - ५५
पंचवटी - ४८
सातपूर - ७
सिडको - ४५
नाशिकरोड - १०५
एकूण - २७४