No deposit : गणेश मंडळांकडून महावितरण घेत असलेली सुरक्षा अनामत रक्कम परत केली जात नाही.
गणेश मंडळे यंदा अधिकृत वीजजोडणी घेणार नसून विद्युत खांबावर 'आकडे टाकून वीज घेण्याचे' ठिय्या आंदोलन करणार
शासन निर्णय : गणेश मंडळांनी एकदा परवानगी घेतली की पुन्हा तीन ते पाच वर्षे परवानगी घेण्याची गरज नाही, तरीही गणेश मंडळांना पुन्हा पुन्हा परवानगी घ्यावी लागते.
नाशिक : शहरातील गणेश मंडळांकडून महावितरण घेत असलेली सुरक्षा अनामत रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून परत केली जात नाही. यंदा ही रक्कम आधी न मिळाल्यास कोणत्याही प्रकारे मंडळे अधिकृत वीजजोडणी घेणार नसून विद्युत खांबावर 'आकडे टाकून वीज घेण्याचे' आंदोलन करणार असल्याचा निर्णय नाशिक शहर सार्वजनिक गणेश महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १२ वाजेनंतर विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाकारल्यास ठिय्या आंदोलन केले जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
गणेशोत्सव महामंडळांची बैठक शुक्रवारी (दि.१) समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर माजी महापाैर विनायक पांडे, हिंदू एकता मंचचे रामसिंग बावरी, गजानन शेलार, लक्ष्मण धोत्रे आदी उपस्थित होते.
महावितरण वीजवापराच्या 'स्लॅब'नुसार दर बदलते. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. शासनाने गणेश मंडळांना मुळात सवलतीचे दर घोषित केले आहेत, तरीही असे केले जाते. त्यातच दरवर्षी गणेश मंडळांकडून अमानत रक्कम घेतली जाते. ती परत केली जात नाही. महावितरणचे अधिकाऱ्यांना याबद्दल विचारले असता 'धनादेश तयार आहे' असे उत्तर मिळते. प्रत्यक्षात मात्र रक्कम जमा होत नाही. त्यामुळे यंदा डिपॉझिटचा प्रश्न न सुटल्यास अनामत रक्कम भरून नवीन वीजजोडणी न घेता रस्त्यांवरील विद्युत खांबांवर आकडे टाकून वीजजोडणी करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला बबलू परदेशी, सत्यम खंडागळे, महेश महंकाळे यांच्यासह शहरातील मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश मंडळांनी एकदा परवानगी घेतली की पु्न्हा तीन ते पाच वर्षे परवानगी घेण्याची गरज नाही, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र असे असताना मंडळांना पुन्हा पुन्हा परवानगी घ्यावी लागते. त्याची गरजच काय? असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला.
नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास मनाई केली जाते. मुंबई-पुण्यात अखेरच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत मिरवणूक सवाद्य चालते. त्यामुळे यंदा पुण्याच्या धर्तीवर यंदा नाशिकमध्ये मिरवणूक सुरूच राहील आणि वाद्य बंद करण्यास सांगितल्यास तिथे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करतील आणि सकाळी ६ नंतर पुन्हा मिरवणूक सुरू करण्यात येईल, असा ठराव बैठकीत करण्यात आला.