ठळक मुद्दे
महापालिकेकडून मंडप शुल्क, जाहिरात करमाफीसह परवानगी मिळत नसल्याने गणेश मंडळांनी घेतला होता आक्रमक पवित्रा
गणेश मंडळांकडून विविध स्वरूपाच्या करमुक्त जाहिराती घेतल्या जातात
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर महापालिकेने गणेश मंडळांना मंडप शुल्कांमध्ये माफी दिली
नाशिक : मंडप आणि जाहिरात शुल्कमाफीवरून नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी बहिष्कारास्त्र उपसल्यानंतर याचा फटका भाजपला महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये बसण्याचा धोका लक्षात घेत, या वादात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना हस्तक्षेप करावा लागला. महाजन यांच्या सूचनेनंतर अखेर महापालिकेने गणेश मंडळांना मंडप शुल्कांमध्ये माफी दिली आहे. त्यामुळे शहरातील सुमारे 700 हून अधिक सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सवलतींचा वर्षाव होईल, अशी अपेक्षा गणेश मंडळांची असताना मंडप व जाहिरात शुल्कमाफीच्या मागणीवरून मंडळांचे पदाधिकारी आणि महापालिका यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिका प्रशासनाने शुल्कमाफीच्या प्रस्तावावर दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरही त्यावर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. उलट शुल्क भरण्यासाठी मंडळांच्या परवानग्या रोखण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणाचा निषेध करत थेट गणेशोत्सवावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या सर्वांचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसू शकतो, ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक आमदारांनी जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधले. महाजन यांनी तत्काळ महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून मंडप तसेच सर्व प्रकारच्या शुल्कांमधून सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा द्यावा अशा आदेशवजा सूचना दिल्या. त्यानंतर आयुक्त खत्री यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेण्यासाठी आकारण्यात येणारी मंडप फी माफ करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मंत्री महाजन यांच्या सूचनेवरून महापालिका आयुक्तांनी गणेश मंडळांना मंडप शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेतला. परंतु, जाहिरात कर मात्र कायम ठेवला होता. त्यामुळे गणेशोत्सव महामंडळांनी आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जाहिरात करमाफी देण्याबाबत कायद्यात तरतूद नसल्याने महापालिका प्रशासनाची कोंडी झाली होती. अखेर जाहिरात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने तोडगा काढला. त्यामुळे महामंडळाने आंदोलनास्त्र म्यान केले.
गणेश मंडळांना मंडप शुल्क तसेच जाहिरात शुल्कमाफी दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ तसेच महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांचे आभार. या निर्णयामुळे मंडळांना दिलासा मिळाला असून, उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे.समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ, नाशिक.