नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दूध बाजार व संत गाडगे महाराज चौक परिसरातील ओव्हरहेड वायर्स अडथळा ठरत असून, त्यामुळे गणेशभक्तांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या वायर्स त्वरित हटवून मिरवणुकीवरील तरंगते विघ्न दूर करावे, अशी मागणी गणेशभक्तांनी महावितरणकडे केली आहे.
शहरात सुमारे 115 सार्वजनिक गणेशमंडळांनी 'श्रीं'च्या मूर्तींची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सवाची धूम बघता यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत निम्म्याहून अधिक मंडळे सामील होऊ शकतात. त्यातील बहुतांश मूर्तींची उंची किमान 15 ते 20 फूट इतकी आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला ओव्हरहेड वायर्स अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत.
मागील वर्षी भद्रकाली परिसरातील संत गाडगे महाराज चौकात डाव्या बाजूच्या विजेच्या खांबांवरील वायर 20 फुटी बाप्पाच्या कानाला अडथळा ठरल्याने विसर्जन मिरवणूक अडखळली होती. त्यामुळे किमान एक तास मिरवणुकीला विलंब झाला होता. अशा प्रकारची समस्या यंदा निर्माण होऊ नये, यासाठी अशा वायर्स मिरवणुकीपूर्वीच दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
भद्रकाली आणि संत गाडगे महाराज चौक परिसरात मिरवणूक मार्गात दरवर्षी ओव्हरहेड वायर्सची समस्या उद्भवते. यावर महावितरणने कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे, जेणेकरून विनाअडथळा विसर्जन मिरवणुका पार पडतील.चेतन शेलार, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती सेना, नाशिक
नाशिकरोड : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे नाशिकरोड परिसरातील सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, यंदाचा लाडका बाप्पा खड्ड्यातून मार्गक्रमण करत पोहोचला. या खड्ड्यांमुळे गणेशभक्तांना देखावे पाहण्यासाठी जीव मुठीत धरून रस्त्याने कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
परिसरात गणेशोत्सवानिमित्त भव्य देखावे साकारले असून, भाविक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. मात्र रस्त्यांची चाळण झाल्यामुळे दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर चारचाकी वाहनचालकांना रस्ता चाचपडत मार्ग काढावा लागत आहे. गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करून महापालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महापालिकेने या आंदोलनांकडे दुर्लक्ष करून तात्पुरते डागडुजीचे काम केले. परंतु काही दिवसांतच हे रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आणि महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले. त्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. महापालिकेला जाग यावी यासाठी पुन्हा राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यांची डागडुजी करताना निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पुन्हा रस्ते उखडले. त्यामुळे नागरिकांचे पैसे खड्ड्यात गेले आहेत. लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी मनमानी काम करीत आहेत. जर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती झाली नाही, तर नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारून महापालिकेसमोर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही ढोलनाद करू.रोहन काकडे, सामाजिक कार्यकर्ते
जेल रोड, कॅनॉल रोड, उपनगर, जय भवानी रोड, संभाजीनगर (प्रेससमोरील मुख्य रस्ता), पाण्याची टाकी, गोसावीनगर, चंपानगरी, फिलोमिना शाळेसमोरचा परिसर, दसक, भीमनगर, शेलार मळा, नारायण बापूनगर, पिंटो कॉलनी, जुना सायखेडा रोड, लोखंडे मळा, शिखरेवाडी, गंधर्वनगरी, मोटवाणीरोड.