ठळक मुद्दे
गणेश मंडळांना एक खिडकी योजनेअंतर्गत तातडीने परवानगी देण्याच्या सूचना
सार्वजनिक गणेश मंडळांच्या सूचना, तक्रारींची महापालिका आयुक्तांनी घेतली दखल
मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा व केबल्स काढून टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना, तक्रारींची महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गंभीर दखल घेतली असून, गणरायाच्या स्थापनेपूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त, अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. मंडळांना एक खिडकी योजनेअंतर्गत तातडीने परवानगी देण्याच्या सूचनाही विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापालिकेत नुकत्याच पार पडलेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी आगामी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. सार्वजनिक मंडळांना मागणीनुसार मंडप उभारणीसाठी एक खिडकीद्वारे तातडीने परवानगी द्यावी. या संदर्भातील अर्ज व परवानगीचा दैनंदिन आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील चौक, मुख्य रस्ते व बाजारपेठांतील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्ते दुभाजक व वाहतूक बेटांची स्वच्छता करावी, पाणी तुंबून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना आयुक्तांनी दिली. विसर्जनासाठी मंडप व कृत्रिम कुंडाची व्यवस्था करावी. तसेच मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा व केबल्स काढून टाकाव्यात. उत्सव काळात पथदीप सुरळीत सुरू राहतील यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठांवरील रस्ते, पदपथ येथील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. विनापरवाना लावलेले फलक, होर्डिंग्ज, झेंडे, पताका तत्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतूक बेट व रस्ते दुभाजकांवर जाहिरात फलक लावू नयेत, याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेशही दिले.
मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवा.
वाहतूक बेट, रस्ते दुभाजकांवरील जाहिरात फलक हटवा.
संपूर्ण उत्सवकाळात पथदीप बंद राहणार नाही याची खबरदारी घ्या.
गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी विसर्जन कुंड उभारणार.
कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निर्मूलनाचे आदेश.
पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक ठेवा.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, तक्रारी प्राप्त झाल्यात कारवाई करा.
विभागीय अधिकाऱ्यांनी दररोज पाहणी दौरा करावा.