The company 'APROK AB' has announced an investment of Rs 350 crore in the first phase of its expansion in Nashik.
नाशिक : 'एपीरॉक एबी' या कंपनीकडून नाशिकमध्ये विस्तार करताना पहिल्या टप्प्यात ३५० कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. गोंदे येथे ४२ एकरात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे मंगळवारी (दि.२६) भूमीपूजन करताना, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष हेलेना हेडब्लॉम यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या गुंतवणूकीतून तब्बल २०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
एपीरॉक एबी या कंपनीचे सातपूर औद्योगिक वसाहत येथे युनिट असून, पुणे, नागपूर आणि मुंबईमध्येही कंपनीचे प्रकल्प आहेत. कंपनीने नाशिकमध्ये विस्तारास प्राधान्य देताना, नव्या प्रकल्पात खाणकाम व बांधकाम ग्राहकांसाठी भूमिगत व जमिनीवरील उपकरणांची निर्मिती, संशोधन व विकास (आर. अँड डी.) तसेच नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. या केंद्रामध्ये उत्पादन व प्रोटोटायपिंगसाठी इमारती, संशोधन प्रयोगशाळा, कार्यालये आणि बाहेरील उपकरण चाचणी मार्ग यांचा समावेश असेल. या केंद्राचे कामकाज २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होण्याची अपेक्षा असून, पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या प्रकल्पाचा एकूण विस्तार सुमारे एक लाख ७५ हजार चौ.मी. इतका असेल.
याबाबत कंपनीच्या अध्यक्ष हेलेना हेडब्लॉम म्हणाल्या, एपीरॉकची नाशिकसह भारतात विविध ठिकाणी उत्पादन केंद्रे आहेत. त्यात एकूण सुमारे एक हजार ७५० कर्मचारी कार्यरत आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात, एपीरॉकने हैद्राबाद येथे खडक खोदकाम साधनांच्या उत्पादनासाठी विस्तारित उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले आहे. तसेच गेल्या वर्षी त्याच शहरात नवीन तंत्रज्ञान केंद्र सुरू केले केले. नाशिकमधील या नव्या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि एपीरॉकच्या नाशिकमधील सध्याच्या सुमारे २८० कर्मचाऱ्यांच्या कार्यबलात आणखी २०० नवीन थेट पदांची भर पडेल.
एपीरॉक इंडियाचे अध्यक्ष अरुणकुमार गोविंदराजन म्हणाले, 'हा नवा प्रकल्प 'मेक इन इंडिया' उपक्रमालाही बळकटी देईल. कंपनीच्या उत्पादनांची जगभरातील ४२ देशांमध्ये ६० टक्के निर्यात केली जात असून, या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यास आणखी गती देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कंपनीच्या नाशिक प्रकल्प प्रमुख कॅटरिंग कोलकिंग म्हणाल्या, 'नव्या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सातपूर औद्योगिक वसाहतीत १६ एकरात आमचा प्रकल्प असून, याठिकाणी दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या प्रकल्पामुळे आणखी रोजगार निर्मिती होणार आहे.' तर एपिरोक इनोव्हेशन अॅण्ड टेक्नालॉजी सेंटरचे महाप्रबंधक चंदू राव म्हणाले, 'कंपनीचे हैदराबाद आणि चेन्नई येथे सॅटेलाइट सेंटर असून, नाशिक युनिट त्यास जोडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.'
टनेल ड्रिल, खडक उत्खनन व बांधकामासाठी लागणारी यंत्रसामुग्री तसेच पृष्ठभाग आणि भूमिगत वापरासाठी लागणाऱ्या साधनांची कंपनीकडून निर्मिती केली जाते. कंपनीचा गोंदे येथील प्रकल्प हा पूर्णत: गो ग्रीन अर्थात हरित संकल्पनेवर आधारित असणार आहे. पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने कंपनीचा हा प्रयत्न असेल, असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.