ठळक मुद्दे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधींजींच्या खुनाच्या जागी वध असा शब्द टाकला
गांधी हत्येच्या कटातील सहआरोपींमध्ये भगूरच्या आरोपीचा समावेश
नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता. नथुराम गोडसे हा पहिला दहशतवादी होता. महात्मा गांधी यांचा खूनच झाला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधींजींच्या खुनाच्या जागी वध असा शब्द टाकला. महाराष्ट्र ग्रंथातून हा शब्द हटवण्यात आला आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक गुरुवारी (दि. 9) झाली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सावरकर हे गांधीहत्येच्या खटल्यातील आरोपी असल्याचे अधोरेखित करताना, त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. सपकाळ म्हणाले की, नथुराम गोडसे हा गांधी हत्येच्या कटातील आरोपी होता. सहआरोपींमध्ये भगूरच्या आरोपीचा समावेश होता. हा आरोपी ब्रिटिशांकडून 60 रुपये पेन्शन घेणारा होता. मात्र, पुराव्याअभावी या भगूरच्या आरोपीची मुक्तता करण्यात आली.
स्वातंत्र्यलढ्यात त्याचे वक्तव्य काय, हा भाग वेगळा. या आरोपीने जेलमध्ये माफीनामा दिला होता. कपूर आयोगाच्या अहवालात या सर्व गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या आरोपीने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. त्यानेच गांधीहत्या घडवून आणली. मी या गोष्टी पुराव्यानिशी बोलत आहे. माझ्यावर कोणाला कोर्टात केस टाकायची असेल, तर टाकावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. सपकाळ यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता भाजप आणि शिंदे गटाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
गोडसेचे उदात्तीकरण ही भाजपची विकृत मानसिकता : थोरात
भाजपकडून महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जाते. यामधून भाजपची विकृत मानसिकता दिसते. देश कसा चालला आहे, हे यावरून कळते. गांधी खून हा कायम चर्चेचा विषय असतो. वादाला प्रतिवाद करण्याची संधी दिली पाहिजे, त्याला प्रतिवाद करा. ही खरी लढाई आहे. या देशाला महात्मा गांधींच्या विचारावर आणावे लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्या. त्यांनी मला कोर्टात खेचा, असे सांगितले असल्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.