नाशिक : आपल्या जीवलग मित्रांसमवेत मैत्री दिन साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. रविवारी (दि. ३) नाशिकजवळील पर्यटनस्थळी जाऊन मैत्रीचा दिवस साजरा करण्याचे बेत तरुणाईने आखले आहेत. यानिमित्त हॉटेल, उपाहारगृहांवरही सजावट करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी (दि.3) जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आपल्या जीवलग आणि प्रिय मित्रांसमवेत हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज आहे. यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील 'पिकनिक स्पॉट' हिरवाईने सजले आहेत.
त्यातच मैत्री दिन आल्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण येणार आहे. त्र्यंबकेश्वरजवळील पहिने, पेठ तालुक्यातील 'बिलकस व्हॅली', कश्यपी धरणाचे बॅकवाटॅर, भावली धबधबा आदी 'पिकनिक स्पॉट'वर मित्रांसमवेत फोटो काढत माैजमजा करण्याचे बेत 'कॉलेजियन्स'ने आखले आहेत. गंगापूर रोड, कॉलेज रोडवरील उपाहारगृह तसेच 'कॅफे हाउस' व्यावसायिकांनी हा दिवश 'कॅश' करण्यासाठी आकर्षक सजावटीसह काही विशेष 'मेनू'चे नियोजन केल्याचे दिसून आले.
मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येलाच अनेकांनी आपल्या प्रिय मित्रासोबतचे रील्स, स्टेटस ठेवायला सुरुवात केलेली दिसून आली. 'कॉलेजियन्स' या दिनाचे विविध बेत आखत असताना, शहरातील काही वृक्षप्रेमी झाडांना मैत्री धागा बांधून अभिनव पद्धतीने मैत्री दिन साजरा करणार आहेत. बच्चे कंपनी पाळीव प्राणी, पक्षी यांच्यासमवेत वेळ देऊन मुक्या जिवांसमवेत मित्रत्वाचे नाते घट्ट करणार आहेत. काही स्वयंसेवी संस्थांतर्फे गोदाकाठी भिकाऱ्यांना अन्न देऊन, सिग्नलवरील मुलांसाठी खाऊ देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मैत्री दिन साजरा करणार आहेत.
-----
-------०--------