नाशिक : नाशिक जिल्हा बँकेत नोकरीच्या बदल्यात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी, बँक अधिकारी भास्कर शंकर बोराडे, स्वीय सहायक मोबीन सलीम मिर्झा यांच्याविरुद्ध १५ लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या संदर्भात आशिष केशव बनकर (रा. काठे गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा बँक वेगवेगळ्या कारणांमुळे व गैरकारभारामुळे चर्चेत आहे. त्यातच या प्रकरणाची भर पडल्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व संचालकांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मार्च २०१६ ते २०२५ या कालावधीत आशिष बनकर यांच्याकडून परवेज कोकणी व इतर दोघांनी १५ लाख रुपये उकळले. त्याला एनडीसीसी बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.
मात्र, गेल्या नऊ वर्षांत फिर्यादीला कायमस्वरूपी नोकरीचे पत्र मिळाले नाही. यासाठी त्यांनी वारंवार परवेज कोकणी व इतर दोघांकडे पाठपुरावा केला. मात्र, संशयित आरोपींकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली गेली. परवेज कोकणीने वारंवार फिर्यादीला आश्वासन दिले की, तुला नोकरी मिळेल. आपल्या बाजूने कोर्टाचा निकाल आला आहे, असे त्याला दाखवले. त्याचबरोबर त्याला बनावट नियुक्तिपत्रही दिले. मात्र, प्रत्यक्षात फिर्यादीला नोकरी मिळाली नाही. पैशाची मागणी केल्यावर परवेज कोकणीने फिर्यादी बनकरला शिवीगाळ व धमकी दिली. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर या घटनेचा अधिक तपास करीत आहे.