

Nashik District Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर गेल्या काही वर्षांत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता त्यात आणखी एक गंभीर आरोपाची भर पडली असून, बँकेचे माजी चेअरमन परवेज कोकणी आणि दोन अधिकाऱ्यांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 15 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेने जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा अविश्वासाची सावली पडली आहे.
फिर्यादी आशिष केशव बनकर (रा. काठे गल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ ते २०२५ या दरम्यान परवेज कोकणी, बँक अधिकारी भास्कर शंकर बोराडे आणि स्वीय सहाय्यक मोबीन सलीम मिर्झा यांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने १५ लाख रुपये घेतले. त्याला जिल्हा बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.
फिर्यादीचा आरोप असा आहे की, परवेज कोकणी यांनी वारंवार “नोकरी मिळणार” असे सांगत त्याला खोटी आश्वासने दिली. एवढेच नव्हे तर, बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याची दिशाभूल केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. कोकणी यांनी “कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आला आहे” असे सांगूनही त्याला खोटी माहिती दिली. परंतु प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नाही.
नऊ वर्षे फिर्यादीने सतत पाठपुरावा केल्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याने त्याने पैशांची परतफेड मागितली. तेव्हा परवेज कोकणी यांनी उलट त्याच्यावर धमकी आणि शिवीगाळ केली, असा गंभीर आरोप आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा बँक आधीपासूनच विविध गैरव्यवहार, आर्थिक अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपामुळे चर्चेत आहे. आता नोकरीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळल्याच्या या गुन्ह्यामुळे बँकेच्या प्रतिमेवर आणखी डाग पडला आहे. पोलीसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवली.
या प्रकारामुळे जिल्हा बँक आणि तिच्या संचालकांबद्दल लोकांच्या मनात शंका अधिकच गडद होत असून, संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.