नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पाथर्डी फाटा परिसरात डेंग्यूसदृश्य आजाराने चारवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विपश्यना मिलिंद बनसोडे या चिमुकलीचा मंगळवारी (दि. २२) मृत्यू झाला. नातेवाईकांनी डेंग्यूमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २३) चिमुकलीवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयाला भेट देऊन उपचारांसंदर्भातील कागदपत्रे आणि रक्ततपासणीचे अहवाल ताब्यात घेतले. मृत्यूचे नेमके कारण काय होते, उपचारादरम्यान कोणत्या तपासण्या करण्यात आल्या आणि डेंग्यूचा संसर्ग होता का, याबाबत तपासणी केली जात आहे.
दरम्यान, संबंधित खासगी रुग्णालयाच्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार चिमुकलीचे यकृत निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यू डेंग्यूमुळे झाला की अन्य कारणामुळे, याचा अंतिम निष्कर्ष वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. संबंधित अहवाल शासनाच्या समितीसमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.
पावसाच्या आगमनानंतर शहरात डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यातच स्वाईन फ्लूचेही रुग्ण वाढत असून, स्वाईन फ्लूमुळे शहरात आतापर्यंत ११ मृत्यू झाल्याची नोंद आहे. डेंग्यूबाधितांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पाथर्डी फाटा येथील घटनेमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
मृत्यूच्या कारणाचा अंतिम अहवाल महत्त्वाचा
चिमुकलीच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी तिच्या उपचारांशी संबंधित कागदपत्रे व तपासणी अहवालांची छाननी केली जात आहे. प्राथमिक अहवालात यकृत निकामी झाल्याचे नमूद असले तरी डेंग्यूशी संबंधित कोणतेही निदान होते का, याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय चौकशीचा अंतिम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
"पाथर्डी फाटा येथील चारवर्षीय चिमुकलीच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित रुग्णालयात जाऊन तपासणी केली आहे. तसेच चिमुकली राहत असलेल्या परिसरात धूरफवारणी वाढवण्यासह नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे."- डॉ. प्रशांत शेटे, प्रभारी मुख्य आरोग्य-वैद्यकीय अधिकारी, मनपा
विपश्यना राहत असलेल्या परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाकडून धूरफवारणी करण्यात येत असून, परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणीही सुरू करण्यात आली आहे. डेंग्यूचा संसर्ग आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.