मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव शहर व परिसरात बुधवारी (दि. २६) एकाच दिवशी चार वेगवेगळे अपघात घडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गिरणा धरण परिसरात पर्यटन व पोहण्यासाठी गेलेले रमजानपुरा येथील रहिवासी आझिम हुसेन अजमल हयात (३८) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा वेग व खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनास्थळी उपस्थित सहकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढून सीपीआर दिला. त्यानंतर त्यांना फारान रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुसरा अपघात गिरणा धरण फाटा व देवळा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर झाला. मुस्लीमनगर येथील अंसारी अब्दुल रहमान अफरोज अहमद (१६) हा दुचाकीवरून गिरणा धरण-चाळीसगाव रस्त्याने जात असताना मागून आलेल्या भरधाव दुचाकीने त्याच्या वाहनाला धडक दिली.
या अपघातात अब्दुल रहमान यांचा जागीच मृत्यू झाला. ते त्यांच्या आईचा एकुलता एक आधार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील अन्य भागांसह महामार्गावर आणखी दोन रस्ते अपघात झाले. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, धरण व नदी परिसरात पर्यटन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ न देणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास न देणे तसेच महामार्गावर वाहतूक नियम व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.