Former MLA Dr. Hiray joins BJP
सिडको : पुढारी वृतसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. २) दुपारी २ वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
डॉ. हिरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, नाशिकला धार्मिक नगरीसोबतच उद्योगनगरी म्हणूनही नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आपण समर्थक व कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या प्रवेशाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
डॉ. हिरे हे सिडको भागातून १० वर्षे नगरसेवक होते. तसेच सहा वर्षे शिक्षक आमदार होते. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वतःचा जनराज्य पक्ष स्थापन केल्यानंतर भाजप, शिवसेना आणि पुन्हा भाजपत प्रवेश केला आहे.
माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे. याचा फायदा आगामी मनपा निवडणुकीत भाजपला होणार आहे.सीमा हिरे, आमदार