Flower Market  AI Image
नाशिक

Flower Farming Boost | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात बहरणार फूलशेती; प्रशासनाकडून विशेष मोहीम!

Flower Farming Boost | सिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष मोहिमेची तयारी सुरू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादनासाठी देश-विदेशात ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एके काळी निर्यातक्षम फूलशेतीस मोठी चालना मिळाली होती. विशेषतः गुलाब, जरबेरा, कार्नेशन यांसारख्या फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अंतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशी बाजारपेठेची दारे ठोठावली होती.

मात्र, गेल्या काही वर्षांत फूलशेतीचा वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ-उतारांमुळे ती दुर्लक्षित झाली. या दुर्लक्षित फूलशेतीला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची संधी साधून, पुन्हा चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले असून, फूलशेतीसाठी विशेष मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे.
जिल्ह्याच्या फूलशेतीला मोठी परंपरा आहे. येथे गुलाब, जरबेरा, कार्नेशन आदी फुलांचे उत्पादन घेतले जात होते. विशेषतः संरक्षित शेती माध्यमातून निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही काही वर्षांपूर्वी लक्षणीय होती.

नाशिकमधील फुलांना मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांसह देशातील विविध शहरांत मागणी होती. त्याचप्रमाणे गुलाबासह विविध फुलांची निर्यातही केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत फूलशेतीचा वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे वाढलेले दर, खते व कीटकनाशकांच्या किमती, पॉलिहाऊस देखभाल, बाजारभावातील चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे पाठ फिरवून अन्य नगदी पिकांकडे मोर्चा वळविला.


आता आगामी सिंहस्थामुळे नाशिकमध्ये फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांची सजावट, स्वागत कमानी, विविध धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणांची सजावट, भाविकांच्या स्वागतासाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. ही मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर फूलशेतीचे क्षेत्र पुन्हा वाढवण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण, दर्जादार रोपे, सिंचन सुविधा, संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान आणि आवश्यक अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

उत्पादित फुलांना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी विक्री व पुरवठा व्यवस्थाही मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त निर्माण होणारी मागणी ही तात्पुरती न राहता, नाशिकच्या फूलशेतीला दीर्घकालीन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकच्या शेतशिवारात पुन्हा गुलाब, जरबेरा आणि विविध रंगांची फुले बहरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फूलशेती दुर्लक्षित का झाली?

जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, निफाडसह विविध भागांत काही वर्षांपूर्वी फूलशेतीला चांगला प्रतिसाद होता. निर्यातदारांकडून गुलाब, जरबेरा आणि कार्नेशन आदी फुलांचा पुरवठा केला जात असल्याचे उपलब्ध व्यावसायिक नोंदींवरून दिसते.

विशेषतः जरबेरा आणि गुलाबासारख्या फुलांसाठी संरक्षित शेती, नियमित देखभाल आणि बाजारपेठेचे अचूक नियोजन आवश्यक असते. मात्र, बाजारभावातील चढ-उतारांमुळे खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची खात्री राहत नसल्यामुळे फूलशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. परिणामी, एके काळी नाशिकच्या कृषी अर्थव्यवस्थेला वेगळी ओळख देणाऱ्या फूलशेतीकडे आता दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

पॅकिंग सुविधा, शीतसाखळीची गरज

फुलांचे उत्पादन हे अत्यंत नाशवंत असल्यामुळे काढणीनंतरची हाताळणी, शीतसाखळी, पॅकिंग आणि जलद वाहतूक यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच केवळ उत्पादन वाढवण्याऐवजी बाजारपेंशी थेट जोडणी, निर्यातदारांशी करार, आधुनिक पॅकिंग सुविधा आणि शीतसाखळी उभारण्याची गरज आहे.

"आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची मोठी मागणी लक्षात घेऊन, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फूलशेतीकडे वळवण्यासाठी नियोजन सुरू आहे. शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधांसह आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जाणार आहे."
— आयुष्य प्रसाद, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT