नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाने दीर्घकालीन ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १० तालुक्यांतील खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ७ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अडीच हजार गावांतील ५ लाख १६ हजार २६० शेतकरी या आपत्तीमुळे अडचणीत आले आहेत.
या सर्व बाधितांसाठी शासनाकडून ४८५.३२ कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, उत्साहात ६ लाख ५१ हजार २८७ हेक्टरवर (१०१.६८ टक्के) पेऱ्या झाल्या.
आठ तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पेरण्या होऊन मका आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढले होते. परंतु पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने सलग ३० ते ५४ दिवस ओढ दिल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात आला. यात मालेगाव तालुक्याला सर्वाधिक झळ बसली असून, एकट्या या तालुक्यात तब्बल एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मदत व पुनर्वसन विभागाने पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत 'ट्रिगर १' लागू केला होता, ज्याचे पंचनामे आता पूर्ण झाले आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात निफाड, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड या तीन तालुक्यांत 'ट्रिगर २' लागू करण्यात आला असून, तिथेही पंचनाम्याचे काम सुरू आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करण्यात आली आहे.
सध्या शेतकऱ्यांना केवळ तात्पुरत्या सवलतीपेक्षा प्रत्यक्ष पीक नुकसानीची भरपाई, कर्जाच्या ओझ्यातून दिलासा आणि पुढील हंगामासाठी आर्थिक भांडवलाची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत हा नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जात असून, शासनस्तरावरुन लवकरात लवकर योग्य निर्णय होऊन हक्काची मदत मिळेल, अशी प्रतीक्षा बळीराजा करत आहे.
खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे असतात. या पिकांच्या मिळणाऱ्या पैशांवर संण-उत्सव, रब्बी आणि उन्हाळी हंगामाचे नियोजन केले जाते. परंतु यंदा दुष्काळाने खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. अशा परिस्थितीत शासनाने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली. मात्र, या पाच हजारांत किराणा भरायचा, मुलांना कपड़े घ्यायची की रब्बीची पेरणी करायची, असा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मालेगाव: बाधित गावे ३१९, बाधित शेतकरी १००१३८, एकूण बाधित क्षेत्र १०७४२५.०६ हेक्टर
सटाणा: बाधित गावे ४५४, बाधित शेतकरी ७८५५२, एकूण बाधित क्षेत्र ७४१५१.७३ हेक्टर
नांदगाव: बाधित गावे २७७, बाधित शेतकरी ७५५२४, एकूण बाधित क्षेत्र ५३०६८.२८ हेक्टर
कळवण: बाधित गावे १५२, बाधित शेतकरी ३२५८६, एकूण बाधित क्षेत्र ३३५१४.५० हेक्टर
देवळा: बाधित गावे १३७, बाधित शेतकरी ३३०५३, एकूण बाधित क्षेत्र ३२९५७.८१ हेक्टर
सुरगाणा: बाधित गावे २३०, बाधित शेतकरी ३४०९२, एकूण बाधित क्षेत्र ३३५७९.२५ हेक्टर
पेठ: बाधित गावे १६२, बाधित शेतकरी १६६५९, एकूण बाधित क्षेत्र १७१७३.२६ हेक्टर
इगतपुरी: बाधित गावे १३१, बाधित शेतकरी २५६९९, एकूण बाधित क्षेत्र २४९३२.८९ हेक्टर
सिन्नर: बाधित गावे ३४७, बाधित शेतकरी ७०७५७, एकूण बाधित क्षेत्र ६४९६०.६६ हेक्टर
येवला: बाधित गावे २००, बाधित शेतकरी ६७२००, एकूण बाधित क्षेत्र ६८२०१.२० हेक्टर
एकूण: बाधित गावे २४०९, बाधित शेतकरी ५१६२६०, एकूण बाधित क्षेत्र ५०७१६४.६४ हेक्टर
मका: २ लाख २९ हजार २६२ हेक्टर
कापूस: २८२२९.१८ हेक्टर
कांदा: २१७७८.४१ हेक्टर
सोयाबीन: ७५९१०.८१ हेक्टर
बाजरी: २३२५९.७४ हेक्टर
तूर: १६४७७.६५ हेक्टर
भात: ६७२९७.६६ हेक्टर
नागली: ४८६६.१५ हेक्टर
ज्वारी: ५७७४.३३ हेक्टर
भुईमूग: ४४४८.११ हेक्टर
मूग: १६६९.५७ हेक्टर