Foreign Nationals Information  Pudhari
नाशिक

Foreign Nationals Information | परदेशी नागरिकांची माहिती दडवणे हॉटेलचालकांना पडले महागात; पाच जणांवर गुन्हे दाखल

Foreign Nationals Information | पोलिस आयुक्तांनी काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित चालकांवर ठेवण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील हॉटेल आणि लॉजमध्ये वास्तव्यस असलेल्या परदेशी नागरिकांची संपूर्ण माहिती पोलिसांना सादर न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी पाच हॉटेल व लॉजचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्तांनी काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित चालकांवर ठेवण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील द्वारका पोलिस चौकी परिसरात असलेल्या हॉटेल व लॉजचालकांना परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती पोलिसांना लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार साई प्रीतम हॉटेल, गोदावरी लॉजिंग, सॅफ्रॉन लॉजिंग, पंचमी हॉटेल आणि हॉटेल पंचवटी एक्सप्रेस या पाच आस्थापनांच्या चालकांना परदेशी नागरिकांसह स्थानिक व बाहेरील व्यक्तींची संपूर्ण माहिती, तसेच पासपोर्ट, विसा व अन्य ओळखपत्रांच्या छायांकित प्रती सादर करणे आवश्यक होते.

संबंधित हॉटेल व लॉजचालकांना १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वास्तव्यस असलेल्या परदेशी नागरिकांची माहिती १६ सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, सूचना देऊनही संबंधितांनी अपेक्षित माहिती पोलिसांकडे जमा केली नसल्याचे तपासात समोर आले.

याप्रकरणी साई प्रीतम हॉटेलचे मालक प्रमोद शेट्टी, सुधीर शेट्टी व तुषार जाधव, गोदावरी लॉजिंगचे मालक संजय मिरजकर, सॅफ्रॉन लॉजिंगचे मालक कुबेर गुप्ता, पंचमी हॉटेलचे मालक अनमोल सावळळे आणि हॉटेल पंचवटी एक्सप्रेसचे मालक अतुल चांडक यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदीनुसार जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात शनिवारि (दि. १०) रात्री ८ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार प्रवीण कुलथे करीत आहेत.
परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत आवश्यक नोंदी ठेवणे आणि संबंधित माहिती वेळेत पोलिसांना सादर करणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली. शहरातील हॉटेल व लॉजचालकांनी नियमांचे पालन करावे, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT