Nashik ZP  Pudhari photo
नाशिक

Nashik ZP Development Plan | प्रत्येक तालुक्याला विकासासाठी मिळणार पाच कोटींचा निधी

Nashik ZP Development Plan | राज्यातील अतिदुर्गम, दुर्लक्षीत आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या 'आकांक्षित तालुका कार्यक्रमा'ला नाशिक जिल्ह्यात मोठा विस्तार मिळाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

  • ५ आकांक्षित तालुके: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, कळवण आणि सुरगाणा या तालुक्यांचा समावेश.

  • ₹२५ कोटी निधी: प्रत्येक तालुक्याला ५ कोटी रुपये याप्रमाणे एकूण २५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर.

  • विकासकामे: कुपोषणमुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, डिजिटल क्लासरूम्स, रस्ते, पाणी, वीज अन् रोजगाराभिमुख कौशल्य विकासावर भर.

  • प्रशासकीय तयारी: निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष आराखडा तयार.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील अतिदुर्गम, दुर्लक्षीत आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या 'आकांक्षित तालुका कार्यक्रमा'ला नाशिक जिल्ह्यात मोठा विस्तार मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि कळवण या चार अतिदुर्गम तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या सुरगाणा तालुक्यासह आता या सर्व पाचही तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर होणार असून यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे.

राज्यभरातील मागास तालुक्यांमध्ये विकासात्मक असंतुलन दूर करून येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे.

प्राप्त होणाऱ्या प्रत्येकी ५ कोटी रुपयांच्या निधीतून या तालुक्यांमध्ये कुपोषणमुक्तीसाठी विशेष मोहीम, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि माता-बाल संगोपन सुविधा, जि. प. शाळांचे सक्षमीकरण, डिजिटल क्लासरूम्स आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवणे, शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा,

पशुसंवर्धन आणि स्थानिक शेतमालाला बाजारपेठ, दुर्गम पाड्यांपर्यंत रस्ते, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय आणि वीज पुरवठा आणि आदिवासी तरुणांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम आणि आर्थिक सक्षमीकरण ही कामे होणार आहेत. यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 'या' चार तालुक्यांना लॉटरी!

यापूर्वी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील केवळ सुरगाणा तालुक्याची 'आकांक्षित तालुका' म्हणून निवड केली होती. सुरगाणा तालुक्यात राबवण्यात आलेल्या उपाययोजनांनंतर आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील इतर मागास व दुर्गम भाग असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि कळवण या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाचही तालुक्यांमध्ये स्थानिक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

जिल्हा प्रशासनाची नजर

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य आणि प्रभावी वापर करण्यासाठी जिल्हा स्तरावरून विशेष आराखडा तयार केला जाणार आहे. तालुक्यातील मूलभूत समस्यांचा प्राधान्याने विचार करून आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT