Nashik Teacher's Constituency Election 2024 file photo
नाशिक

Nashik | तीन केंद्रांवर आढळल्या पाच अतिरिक्त मतपत्रिका

अतिरिक्त मतपत्रिका आढळल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीमध्ये प्रत्यक्ष मतदान झाल्यापैकी अतिरिक्त पाच मतपत्रिका आढळल्या. त्यामध्ये निफाड आणि येवला केंद्रांमध्ये प्रत्येकी एक, तर चोपडा येथील मतपेटीमध्ये तीन अशा एकूण पाच मतपत्रिका मतदानापेक्षा अधिक आढळल्याने खळबळ उडाली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या मतपत्रिका वैध आहेत मात्र, केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या तांत्रिक चुकीने झाले असावे असे सांगण्यात आले.

शहरातील अंबड केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे सकाळी ८ पासून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल आहेत. महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, युतीचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात चुरस दिसून येत आहे. दरम्यान, तीन केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाल्यापैकी अतिरिक्त पाच मतपत्रिका आढळल्या. त्यामध्ये टेबल क्रमांक २१ या चोपड्याच्या टेबलवर झालेल्या मतदानापेक्षा तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आहेत, तर टेबल क्रमांक २२ या निफाड केंद्रावर एक तसेच टेबल क्रमांक २३ या येवला येथील टेबलवर एक अशा एकूण पाच मतपत्रिका अधिक आढळून आल्या होत्या. या बाबी तपासण्यामध्ये साधारणपणे एक ते दीड तास गेला. त्यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उद्धव ठाकरेंचा फोन

मतपत्रिका जास्त असल्याबाबत माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना फोन करत अधिक माहिती घेतली. सुरुवातीपासूनच मतमोजणीच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT