fire case. 
नाशिक

Nashik Diwali Fire Case | फटाक्यांच्या आतषबाजीने 40 ठिकाणी आग

Nashik Diwali Fire Case | 21 बंबाजी आगीवर नियंत्रण; नागरिकांनी सुरक्षेतेचे नियम पाळण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिक शहरात आगीच्या घटनांचा अक्षरशः भडका उडाला. फटाके वाजवताना उडवलेल्या ठिणक्यांमुळे शहरातील विविध भागात तब्बल ४० ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या २४ घटना घडल्या होत्या.

यंदा त्यात १६ घटनांची वाढ झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ केली. सुदैवाने जवानांच्या तत्परतेमुळे बहुतांश ठिकाणी आग पसरण्यापूर्वीच नियंत्रणण्यात आणण्यात यश आले.

लक्ष्मीपूजनाचा धार्मिक विधी आटोपल्यानंतर सायंकाळी नागरिकांनी फटाके वाजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आगीच्या घटनांचे सत्र सुरू झाले. ४ नोव्हेंबर सायंकाळी सहा ते ९ नोव्हेंबर सकाळपर्यंत या कालावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागांत आगीच्या घटना घडल्या. त्यानंतरही फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रकार सुरू होते.

काळाराम मंदिर परिसर फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. मदिना चौकातील भंगाराच्या गोदामालाही आग लागली. सातपूर, अंबड, नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर, पंचवटी आणि कॉलेज रोड परिसरतही आगीच्या घटना घडल्या. बहुतांश घटनांमध्ये नारळाच्या झाडांनी तसेच परिसरातील गवतने पेट घेतल्याचे समोर आले.

काही ठिकाणी फटाक्यांच्या ठिणक्या झाडांवर, गवतवर आणि मोकळ्या जागेतील ज्वलनशील वस्तूवर पडल्याने आग लागली. आगीची घटना निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी ती विझवण्यासाठी प्राथमिक प्रयत्न केले. मात्र, काही ठिकाणी आगीने वेगाने पेट घेतल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत नागरिकांमध्ये घबराट आणि धावपळ सुरू होती. जवानांनी घटनास्थळ पोहोचताच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. सर्व घटनांसाठी एकूण २१ अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी आग विझवण्यासाठी पुन्हा पाणी आणावे लागल्याने बंबांच्या प्रत्येक दोन फेऱ्या करण्यात आल्या.

विशेष म्हणजे आगीच्या घटनाबाबत सर्वाधिक फोन अग्निशमन दलाच्या मुख्यालयात प्राप्त झाले. एकाच वेळी विविध भागांतून आगीचे कॉल येत असल्याने उपलबद्ध मनुष्यबळ आणि वाहनांचे नियोजन करणे जवानांसाठी आव्हानात्मक ठरले. दिवाळीच्या उत्सवात फटाके फोडताना नागरिकांनी सुरक्षेतेचे नियम पाळण्याची गरज या घटनांमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे, विशेषतः झाडे, गवत, भंगार साहित्य आणि वाहनांच्या आसपास फटाके फोडावे, असे आवाहन या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.

वझिरे मळा परिसरात भंगार गोदामाला आग

मुंबई नाका पोलिस ठाण्याजवळील वझिरे मळा परिसरात रविवारी (दि. ८) रात्री ९ च्या सुमारास भंगार गोदामाला आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत भंगार साहित्य नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तीन अग्निशमन बंबांच्या मदतीने जवानांनी आग नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले. या मोहिमेत शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्राचे लीडिंग फायरमन विजय मुसळे, नितीन मस्के, सागर शिंदे, मानधन कर्मचारी यश शिरसाट आणि वाहनचालक नाझीम शेख यांनी सहभाग घेतला.

वापरलेले अग्निशमन बंब

  • वेळ: सायंकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत मोठ्या प्रमाणात घटना.

  • नोंद: ९ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत ४० तक्रारी.

  • अतिरिक्त फेऱ्या: तीन बंबांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या.

आगीच्या घटनांची ठिकाणे

  • जय भवानी रोड, एमआयडीसी, सातपूर, बळी मंदिर, सिडको फायर स्टेशनच्या मागे, विहितगाव, गोबिंदनगर, दत्त चौक, गणेश चौक, अशोक स्तंभ, मोरवाडा, डॉन बॉस्को स्कूलजवळ

  • इंदिरानगर जॅॉगिंग ट्रॅक, लेकनगर, राजीवनगर, चाडेगाव शिवार, लेखनगर, कोणार्कनगर गणेश मार्केट, मेनरोड, मनपा कार्यालयाशेजारी, जेलरोड, शिवशक्तीनगर

  • ढिकलेनगर, नाग चौक, काठे गल्ली, रंगुबाई जुन्नर शाळा, वझिरे मळा, मदिना चौक, विडी कामगारनगर, सिरीन मेडॉर्ज, पौर्णिमा स्टॉप, वैद्यनगर

  • विसे मळा, सहजीवन कॉलनी, गडकरी चौक, जनलक्ष्मी बँकेजवळ विहितगाव, बगुलनगर, होलाराम कॉलनी, शरणपूर रोड, परबनगर, इंदिरानगर, कृषीनगर, सायकल सर्कल, संत कबीरनगर, द्वारका

  • विराज इस्टेट, गोबिंदनगर, मेट्रो झोन, पाथर्डी फाटा, के. के. वाघ कॉलेजजवळ, कॉलेज रोड, मेट्रो शोरूम

  • गुंजाळबाबानगर, हिरावादी, भिकूसा पेपर मिल, हिरवाडी, कुमावतनगर, दतनगर, पौर्णिमा स्टॉप, पोस्ट ऑफिसजवळ, जेलरोड, शिवाजीनगर, कॉलेज रोड, अग्रवाल हाऊसिंग सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT