milk price 
नाशिक

Buffalo milk price hike | सणासुदीत दूध, दळणाचे दर वाढले, म्हशीच्या दूध दरात लिटरमागे १० ते १५ रुपयांनी वाढ

दळण दरातही किलोमागे एक रुपयाने वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : वाढती महागाई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दळणाच्या दरात वाढ झाली आहे. म्हशीच्या दुधाचे दर सध्या २० ते १०० रुपये, तर गायीच्या दुधाचे दर ५० ते ६० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत दुधाच्या दरात सरासरी १० ते १५ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना लिटरमागे अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तसेच पीठगिरणी संघटनेनेही दळण दरात किलोमागे एक रुपया वाढीचा निर्णय घेतला आहे.

सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने दुधाच्या मागणीत नियमितपेक्षा काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच जनावरांच्या चाऱ्याच्या दरात झालेली वाढ आणि इतर खर्चाचा परिणाम दूधविक्रीच्या दरावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी म्हशीचे दूध ८० ते ८५ रुपये, तर गायीचे दूध सुमारे ४० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांत म्हशीच्या दुधाच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

मंगळवारी (दि.१) दूध बाजारात म्हशीचे दूध ९० रुपये प्रतिलिटर, तर शहरातील काही भागांत १०० रुपये प्रतिलिटर दराने विक्री झाले. शनिवार ते सोमवारदरम्यान काही ठिकाणी १०० रुपये प्रतिलिटर दराने दूधविक्री झाली. दररोजच्या मागणी-पुरवठ्यानुसार दुधाच्या दरात काही प्रमाणात चढउतार होत असला, तरी ग्राहकांकडून पूर्वीप्रमाणेच मागणी आहे.

सणासुदीच्या काळामध्ये दुधाची मागणी नेहमीपेक्षा वाढली आहे. मात्र, त्याचवेळी जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दूधविक्रीचा खर्च वाढत असून, त्याचा परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या दरावर होत आहे. काही ग्राहकांना घरपोच दूध नेऊन द्यावे लागत असल्याने आणि इंधन दरवाढीमुळे आमचा वाहतुकीचा खर्च वाढला आहे. वाढलेला खर्च आणि ग्राहकांची मागणी यांचा समतोल साधण्यासाठी दरात काही प्रमाणात वाढ करणे अपरिहार्य आहे. ग्राहकांनीच सध्याची परिस्थिती समजून घ्यावी.

- शांताराम शिंदे, दूधविक्रेते, जेलरोड

वाढते वीजबिल, कामगारांचे वेतन आणि पीठगिरणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता दळणाच्या दरात किलोमागे एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय पीठगिरणी मालक संघटनेने घेतलेला होता. त्यामुळे अपरिहार्यपणे आता विविध धान्ये, डाळी आणि मसाल्यांच्या दळणासाठी आता नवीन दर आकारले आहेत.

- धनुशेठ खैरनार, अध्यक्ष, नाशिक शहर पीठगिरणी मालक संघ

दुधाचे दर असे... (रुपये प्रतिलिटर) म्हशीचे दूध : ९० ते १०० गायीचे दूध : ५० ते ६० पूर्वीचा म्हशीच्या दुधाचा दर : ८० ते ८५ वाढ : सरासरी १० ते १५

दळणाचे नवीन दर असे.. धान्य दर (रुपये प्रतिकिलो)

गहू, बाजरी ६

डाळी, रवा, तांदूळ, भाजणी ८

मका, नागली १०

मिरची व मसाले ६०

हळद व कोल्हापुरी मसाला ७०

सर्व प्रकारच्या ओल्या डाळी व ओला गहू २५

मशीन शेवईसाठी ३५

खारीक व खोबरे ४०

दरवाढीची कारणे :

वाढते वीज बिल, कामगारांचे वेतन आणि गिरणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत झालेली वाढ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT