Sinnar Leopard Rescue  
नाशिक

Sinnar Leopard Rescue | बिबट्याचे बछडे अखेर विसावले मातेच्या कुशीत !

Sinnar Leopard Rescue | निमगाव-देवपूर; वनविभागाची संवेदनशील आणि धैर्यपूर्ण कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

आईच्या मायेला पारखे झालेले विबट्याचे तीन निरागस बछडे आणि परिसरात दाटलेली भीती... मात्र योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि वनविभागाच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे अखेर हा थरार सुखरूपरीत्या पार पडला.

तालुक्यातील निमगाव देवपूर येथे घडलेल्या या घटनेने मानव व वन्यजीव यांच्यातील समतोल जपण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. निमगाव - देवपूर येथील शेतकरी यशवंत रामदास कांडेकर यांच्या उसाच्या शेतात (गट नंबर २८६) ऊसतोड सुरू असताना रविवारी (दि. ८) सायंकाळी ५.३० च्या सुमारास अंदाजे २० ते २५ दिवसांचे बिबट्याचे तीन बछडे आढळले होते.

परिसरात आधीच विबट्याची दहशत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब सरपंच व ग्रामस्थांच्या लक्षात येताच तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्यात आला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. वनविभागाने रात्रभर पहारा दिला. अखेर सोमवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली.

सहायक वनसंरक्षक कल्पना वाघेरे व वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अत्यंत संयमाने राबविण्यात आली. यात वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक संतोष चव्हाण, वन्यजीव बचाव पथकाचे निखिल वैद्य, रोहित लोणारे तसेच वनकर्मचारी नारायण वैद्य व मधुकर शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली.

बिबट मादी आणि तिचे तीनही बछडे कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या पुढील कार्यवाहीसाठी मोहदरी वनोद्यानात हलविण्यात आले. बछड्यांना पुन्हा मातेच्या सानिध्यात पाहून उपस्थितांनी सुटकेचा निः श्वास सोडला.

भीतीचे वातावरण; मानव-बिबट्या संघर्ष टळला

भीतीच्या वातावरणातही संयम, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता दाखविली, तर मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. सिन्नर वनविभागाच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT