नाशिकरोड: समाजात वाढत चाललेल्या असुरक्षिततेमुळे माणूस माणसापासून दूर जात असून, जात-धर्माच्या चौकटीत सुरक्षितता शोधण्याचा धोका वाढत आहे. ‘इतरांमुळेच आपल्याला धोका आहे’ हा समज पक्का करून जातीयवादी शक्ती समाजात दरी निर्माण करत आहेत. भीती निर्माण करून सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न लोकशाहीस घातक असून, अशा काळात साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी गप्प बसू नये, असे परखड प्रतिपादन 27 व्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सायमन मार्टिन यांनी केले.
नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स शाळेच्या बाळ येशू तीर्थक्षेत्र प्रांगणात शुक्रवार (दि. 9) पासून सुरू झालेल्या तीनदिवसीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मार्टिन म्हणाले की, खोट्या नॅरेटिव्हच्या माध्यमातून समाजात भ्रम आणि भीती पसरवली जात आहे. भीतीच्या छायेत माणूस विचार करू शकत नाही. जेथे संवाद असतो तेथेच शांतता नांदते. भारतीय संस्कृतीचा आत्मा सर्वसमावेशकतेत आहे. भारत हे अनेक भाषा, संस्कृती, विचारधारा आणि परंपरांचे महावस्त्र आहे; मात्र सध्या धर्म व सत्तेच्या नावाखाली या विविधतेचे सपाटीकरण सुरू आहे. फूट पडलेले राष्ट्र कधीही प्रगती करू शकत नाही.
ते म्हणाले, अंधार दाटलेला असताना बोलणे अधिक आवश्यक असते. रंगावरून देशभक्ती ठरवू नये. दरोडेखोरांना घाबरून साहित्यिकांनी लेखन थांबवू नये. पुस्तकांपासून आणि भाषेपासून दूर गेलो, तर आपले कोणीच तारणहार राहणार नाही. दिवस अंधारले असले तरी अंधारात गीत गायलेच पाहिजे. मराठी भाषा टिकवणे ही काळाची गरज असून, नवीन विचार स्वीकारत प्रेमाचे पूल बांधले पाहिजेत.
अध्यात्माची व्यापक मांडणी
सायमन मार्टिन यांनी भारतीय अध्यात्माची व्यापक मांडणी करताना सांगितले की, भारतीय अध्यात्म चिरंतन सत्याचा उद्घोष करते. त्यावर जहालवादी जातीय राजकारणाच्या सीमा लादता येणार नाहीत. सहिष्णुतेपेक्षा परस्पर स्वीकार ही अधिक उदात्त संकल्पना आहे. केवळ धार्मिक असून चालणार नाही, तर बहुधार्मिक होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य आणि समता नसताना प्रभू येशू ख्रिस्तांनी विचारांची दिशा बदलली.
ख्रिस्ती लेखकांचे मोठे योगदान
मराठी साहित्यातील अनेक साहित्यप्रकारांची प्रथम निर्मिती ख्रिस्ती लेखकांनी केल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, आजचा माणूस स्वयंपूर्ण असला तरी एकाकी झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जीवन सुखकर झाले असले, तरी कुटुंब आणि समाजात एकाकीपणाची वेदना वाढली आहे. म्हणूनच हा संभ्रमाचा काळ आहे.
उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष फादर एरॉल फर्नांडिस, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. वेदश्री थिगळे, बायबल तज्ज्ञ फादर आयवो कोयलो आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरिया, पाटोळे, टिळक यांचा गौरव
यावेळी फादर फ्रान्सिस कोरिया व सनी पाटोळे यांना साहित्य भूषण, तर मुक्ता टिळक यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकाळी ग्रंथ दिंडी, तर सायंकाळी संविधान दिंडी काढण्यात आली. रात्री कवी संमेलन रंगले.