सिडको : पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, काही वेळातच तो पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच वडिलांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही बुडून मृत्यू झाला.
या घटनेत मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मिळून आला. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय धोंडू सोनवणे (वय ५८, रा. अक्षय चौक, सिडको) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवार रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर श्री सोनवणेचा मृतदेह शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सापडला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बोराडे आणि पोलिस हवालदार तुपलोंढे करत आहेत.