नाशिक बैठकीत जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेले बाधित शेतकरी 
नाशिक

Nashik Ring road land acquisition issue|बाह्य-अंतर्गत रिंगरोडसाठी चुकीचे जमीन अधिग्रहण? दडपशाही केल्यास संघर्ष अटळ

शेतकऱ्यांचा एल्गार : मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक/सिडको : बाह्य आणि अंतर्गत रिंगरोड प्रकल्पासाठी चुकीच्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने दडपशाही करून जमिनी घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष अटळ आहे. रविवारी (दि. १७) विल्होळी येथील कै. केशवराव थोरात ग्रामसंस्कार केंद्रात आयोजित बैठकीत विविध गावांतील शेतकरी एकत्र आले होते. बैठकीत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला.

बैठकीमध्ये कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुंभमेळामंत्री हे पद संविधानिक नसून, त्या पदाचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकत जबरदस्ती भूसंपादन केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच जलसंपदामंत्री म्हणून उत्तर महाराष्ट्र त्यांच्या अधिकारक्षेत्रात नसताना जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप कोणत्या अधिकाराने करत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी एकमुखाने ठराव करत गिरीश महाजन यांनी चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप सुरूच ठेवला तर त्यांच्या कुंभमेळामंत्री या पदालाच न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच जिल्ह्याला तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींमधून पालकमंत्री द्यावा, अशी मागणीही केली. नाशिकचा पालकमंत्री नाशिकचाच असावा, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी योग्य दार उपलब्ध होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावरही शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. यापूर्वीही चुकीच्या जमीन हस्तांतरण प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका राहिल्याचा आरोप करत, आता कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते अधिग्रहणासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शेतकरी म्हणाले. त्यामुळे मंत्री महाजन जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक जिल्ह्याच्या कारभारातून हटवून नवीन जबाबदार पालकमंत्री व जिल्हाधिकारी नियुक्त करावेत, अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास शासनाविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. बैठकीस छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शेतकरी नेते साहेबराव दातीर, अॅड. कैलास खांडबहाले, कामगार नेते विक्रम नागरे, शिवसेना शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे यांच्यासह विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते

तीन तासांचे आत्मक्लेश आंदोलन

शेतकऱ्यांनी नव्याने करण्यात आलेल्या मोजणीला पूर्ण विरोध दर्शवत, आमची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. तसेच मातोरी व मुंगसरा येथे शेतकरी व महिलांवर झालेल्या लाठीचार्जबाबत काय कारवाई झाली याचा जाबही जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाणार आहे. यानंतर मुंगसरा येथे लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या ८० वर्षीय आजींच्या घरी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तीन तासांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान पुढील तीव्र आंदोलनाची दिशाही घोषित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली असून, बैठकीसाठी सर्व बाधित शेतकरी एकत्र येणार आहेत. यापूर्वी करण्यात आलेल्या चुकीच्या मोजण्या तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी केली जाणार आहे. डीपी व आरपी रोडच्या नियमानुसार नव्याने मोजणी करावी, ज्या शेतकऱ्यांची जमीन जाईल त्यांना चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT