MPSC Success Story  
नाशिक

MPSC Success Story | जिद्द, परिश्रम अन् आत्मविश्वास! चिखलआंबेच्या शीतलने मिळवले एमपीएससीत घवघवीत यश

MPSC Success Story | शीतलचा चिखलआंबेसह पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव ; दुय्यम निबंधक वर्ग-1 या पदाला गवसणी

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : सुनील थोरे
चांदवड तालुक्यातील चिखलआंबे येथील शेतकरी कुटुंबातील कन्या शीतल शंकर लांडगे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होत दुय्यम निबंधक वर्ग-१ या पदाला गवसणी घातली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शीतलने आपल्या जिद्द, इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमाच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे चिखलआंबेसह संपूर्ण पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे.

शीतलचे आई-वडील शेती व्यवसाय करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. विशेष म्हणजे, यापूर्वी दोन वेळा यशाने हुलकावणी दिल्यानंतरही तिने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केला.

अपयशाला संधी मानत सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अखेर तिने एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले. शीतलने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण जनता विद्यालय, पारेगाव येथे पूर्ण केले; त्यानंतरचे शिक्षण पिंपळगाव बसवंत आणि पुणे येथे घेतले.

शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर तिने मेहनतीची कास धरत स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. शीतलच्या यशाची वार्ता समजताच चिखलआंबे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत तिची मिरवणूक काढून भव्य सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

अपयशाने न खचता पुढे जावे

शेतकरी कुटुंबातील मुलांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करावेत, याचे प्रेरणादायी उदाहरण शीतल लांडगे हिने आपल्या यशातून निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT