Family Planning  
नाशिक

Family Planning | वेदना तिचीच, त्यागही तिचाच!

कुटुंब नियोजनात माउलींवरच भार; पुरुषांचा टक्का कमी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १३ हजार ५८१ नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या. पण या यशाचा पाया नाशिकच्या माता - भगिनींच्या त्यागावर रचला गेला आहे. या एकूण शस्त्रक्रियांपैकी तब्बल १३ हजार ११५ महिलांनी स्वतःच्या शरीरावर शस्त्रक्रियेच्या वेदना सहन केल्या. मुलांचे संगोपन, घराची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी या आरोग्याच्या जोखमीलाही हसतमुखाने तोंड दिले. याउलट, स्वतःला कुटुंबाचा कणा म्हणवणाऱ्या पुरुषांपैकी केवळ ४६६ पुरुषांनीच नसबंदीचे धाडस दाखविले. पुरुषांची नसबंदी ही अत्यंत सोपी, विनावेदेनेची आणि अवघ्या काही मिनिटांची असते. तरीही केवळ अनाठायी भीती आणि 'मी पुरुष आहे' या अहंकारापोटी पुरुषांनी या जबाबदारीतून नेहमीप्रमाणे पळ काढल्याचे विदारक चित्र आहे.

केवळ कायमस्वरूपी शस्त्रक्रियाच नाही, तर तात्पुरत्या स्वरूपात कुटुंब नियोजन करतानाही महिलांनीच स्वतःच्या आरोग्याची होळी केली आहे. विविध गोळ्या आणि अंतरासारख्या वेदनादायी इंजेक्शनचा मारा आपल्या शरीरावर करून घेणाऱ्या महिलांची आकडेवारी पाहिली की, समाज म्हणून आपण किती मागे आहोत, याची जाणीव होते. मार्च २०२६ अखेर अहवालानुसार जिल्ह्यात एकूण १३,५८१ नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

त्यापैकी १३ हजार ११५ महिला नसबंदी, तर ४६६ पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याशिवाय, तात्पुरत्या गर्भनिरोधक साधनांचाही मोठ्या प्रमात पुरवठा करण्यात आला असून, तब्बल १३ हजार ८४३ महिलांना 'आययूसीडी' सेवा देण्यात आली आहे.

तसेच, ३ हजार २३७ महिलांनी अंतरा इंजेक्शन, ११,५८० महिलांनी छाया गोळ्या, २,०२३ जणींनी इमर्जन्सी कॉन्ट्रिसेप्टिव्ह आणि ८, ५७८ महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा सुरक्षितपणे लाभ घेतला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टानुसार ग्रामीण आणि दुर्गम भागात जनजागृती करून ही कामगिरी केली आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देत आहेत. मात्र, समुपदेशन करूनही पुरुष नसबंदीसाठी सहजासहजी तयार होत नसल्याची खंत आरोग्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नाही. सुदृढ आणि आनंदी कुटुंबासाठी पुरुषांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात महिला नसबंदीच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीबाबत समाजात असलेले गैरसमज व भीती दूर करून, अधिकाधिक पुरुषांनी स्वतःहून पुढाकार घेत या प्रक्रियेत स्वेच्छेने सहभाग नोंदवावा.

- डॉ. हर्षल नेहते (जिल्हा मातासंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद

आधुनिक तंत्रज्ञान व आरोग्य यंत्रणेची तत्परता

प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय आणि आयुष्मान आरोग्य मंदिरे (आरोग्य व कल्याण केंद्रे) या सर्व ठिकाणी या सेवा मोफत उपलब्ध आहेत. विशेषतः आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पात्र दाम्पत्यांची 'RCH 2.0' या अद्ययावत प्रणालीमध्ये ऑनलाइन नोंदणी करून त्यांचा नियमित पाठपुरावा केला जात आहे. प्रसूतीनंतरच्या कुटुंब नियोजन सेवांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, प्रत्येक दाम्पत्याला त्यांच्या गरजेनुसार योग्य साधन निवडण्यासाठी शास्त्रीय समुपदेशन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT