नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. या बनावट अकाउंटवरून नागरिकांना संदेश पाठवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कोणीही अशा बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटवर संपर्क साधू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
अज्ञात व्यक्तीने परदेशी क्रमांकाच्या अकाउंटवर 'आयुष प्रसाद' असे इंग्रजीतील नाव व जिल्हाधिकारी, नाशिक यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. तसेच +66 92 455 6074 या थायलंडच्या क्रमांकाचा वापर करण्यात आला असून, बिझनेस अकाउंट दर्शवण्यात येत आहे.
संबंधित क्रमांकावरून "Hello... How are you doing... Where are you at the moment?" अशा स्वरूपाचे संदेश पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी सदर क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला, फोनला अथवा अन्य स्वरूपातील संपर्काला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या क्रमांकावर कोणतीही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे अकाउंट अधिकृत नसून, नागरिकांनी त्याची नोंद घेऊन सावधगिरी बाळगावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.