Court File Photo
नाशिक

Arun Patil Nashik | भोंदू महाराज अरुण पाटीलची अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव

Arun Patil Nashik | गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले पाटील यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अघोरी पूजाविधीच्या माध्यमातून दमा बरा करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या संशयित अरुण धोंडू पाटील याने अटक टाळण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले पाटील यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी (दि. २६) सुनावणी होणार असल्याने प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

संशयिताचे स्थानिक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून त्याने अन्य नागरिकांचीही फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जमीन शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत. अटकपूर्व जामीनाच्या अर्जावरील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.

अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक

गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा संशयित अरुण पाटील स्वतःला महाराज म्हणून भासवून नागरिकांचा विश्वास प्राप्त करत होता. फेब्रुवारी २०२२ पासून त्याने संबंधित महिलेला दमा पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

महिलेला वाहनातून सोमेश्वर धबधबा परिसर तसेच गंगापूर शिवारातील गोदावरी नदीकाठी नेण्यात आले. यावेळी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून अघोरी पूजाविधी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कालभैरव पूजा आणि अघोरी विद्येच्या नावाखाली सुरवातीला ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

त्यानंतर घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयिताने टप्प्याटप्प्याने एकूण साडेसात लाख रुपये उकळल्याच्या तक्रारीत नमूद आहे. पूजाविधीच्या ठिकाणी मानवी कवटी आणि बोकड ठेवण्यात आल्याचाही उल्लेख आहे. अपेक्षित परिणाम न झाल्याने महिलेने विचारणा केली असता, मासिक पाळी किंवा डोळ्यांची पट्टी काढल्यामुळे विधी निष्फळ ठरल्याची कारणे सांगितल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT