विकास गामणे, प्रतिनिधी
कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना थेट रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या 'मुन्नाभाई' अर्थात बोगस डॉक्टरांचे इगतपुरी तालुका हे जणू माहेरघरच बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नाशिक जिल्हा आरोग्य विभागाने सन २०१९-२० पासून आतापर्यंत केलेल्या कारवायांच्या आकडेवारीवरून ही गंभीर बाब उघड झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४ अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील तब्बल १९ गुन्हे एकट्या इगतपुरी तालुक्यातील आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण बोगस डॉक्टरांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक बोगस डॉक्टर हे केवळ इगतपुरी तालुक्यात कार्यरत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि आदिवासी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत या बोगस डॉक्टरांनी आपले जाळे पसरवले आहे. वैद्यकीय ज्ञान नसतानाही सर्रास इंजेक्शन देणे, सलाइन लावणे आणि अँटिबायोटिक्सचा मारा करून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे प्रकार सुरू आहेत. याविरोधात जिल्हा आरोग्य यंत्रणेने धडक मोहीम हाती घेतली असून, संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच १९ गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये घोटी पोलिस ठाण्यात सर्वाधिक ९, इगतपुरी पोलिस ठाण्यात ८, तर वाडीवर्हे पोलिस ठाण्यात २ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. इगतपुरी पाठोपाठ नांदगाव आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी ५ गुन्हे दाखल झाले असून, तिथेही बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येते. याव्यतिरिक्त कळवण (अभोणा पोलिस ठाणे), पेठ, बागलाण, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यातील इतरही संशयास्पद ठिकाणी आरोग्य विभागामार्फत कसून चौकशी सुरू आहे. जिथे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय आढळून येईल, तिथे तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, इगतपुरीसारख्या तालुक्यात वारंवार कारवाया होऊनही बोगस डॉक्टरांची संख्या कमी होत नसल्याने, या 'मुन्नाभाई'ना कोणाचे अभय आहे का. असा संतप्त प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना संशयित दवाखान्यांची कसून तपासणी करण्याचे आणि दोषी आढळल्यास तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत.- डॉ. राजेंद्र बागूल (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद).
आरोग्य विभागाची ही मोहीम यंदाही (सन २०२६) सुरूच आहे. येवला तालुक्यातील बोकटे येथे अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर दि. ४ जून २०२६ रोजी धाड टाकून दि. ५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सुरगाणा येथेही २७ ऑगस्ट २०२६ रोजी बोगस डॉक्टरवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.