नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उभारणीची प्रक्रिया सुरू असताना अद्यापही पाच पेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन्सचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे चार्जिंग स्टेशन्सचा दहा कोटींचा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने आयुक्त मनिषा खत्री ॲक्शन मोडवर आल्या असून मनपाने हाती घेतलेल्या सर्व २० चार्जिंग स्टेशन्सचे काम सप्टेंबरअखरे पूर्ण करण्याचा अल्टीमेटम विदयुत-यांत्रिकी विभागाला देण्यात आला आहे.
शासनाच्या ईलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत नाशिक शहरात २० इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. यासाठी शासनाकडून दहा कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. यासाठी महापालिकेने 'सर्वोटेक पॉवर सिस्टिम लिमिटेड' या कंपनीला कंत्राट दिले आहे. आतापर्यंत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, प्रमोद महाजन उद्यान, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक, सातपूर विभागीय कार्यालय, महात्मा नगर क्रिकेट मैदान या पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर चार्जिंग स्टेशन सुरु झाले आहेत.
उर्वरित १५ पैकी नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिक पूर्व विभागीय कार्यालयांसह फाळके स्मारक व लेखानगर या पाच ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे चार्जिंग स्टेशन उभारणीचा निर्णय रद्द करावा लागला आहे. या पाच ठिकाणांएेवजी मनपा क्रिडांगण शिवनगर, पंचवटी, मनपा मोकळी जागा, जेलरोड, नाशिकरोड, काळेनगर जॉगिंग ट्रॅक, पाईपलाईनरोड, सातपूर, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक, नवीन नाशिक, व गाडेकरमळा जाँगिंग ट्रॅक, आर्टिलरी रोड, नाशिकरोड या पाच पर्यायी जागांवर चार्जिंग स्टेशनची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेला मोठा विलंब लागत असल्याने चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी दिलेला निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन्सची कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पुर्ण करण्याचा अल्टीमेटम आयुक्तांनी दिला आहे.
चार्जिंग स्टेशन्सची कामे पुर्ण करून ती कार्यान्वित करण्याच्या सूचना देताना यासाठीचा निधी शासनाकडे परत जाऊ नये यासाठी सदर कामाच्या वित्तीय प्रगतीबाबत देयके अदा करण्याची प्रक्रिया तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी विद्युत व बांधकाम विभागाला दिल्या आहेत.