नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून भद्रकालीत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यासाठी भद्रकालीतील मलनिस्सारण केंद्राच्या मागील पार्कींगसाठी आरक्षित असलेली महापालिकेच्या मालकीची जागा महावितरणच्या ताब्यात दिली जाणार आहे. ही जागा महावितरणला रेडीरेकनर मूल्यांकन दरानुसार द्यावी की भूसंपादन कायद्यानुसार रेडीरेकनरच्या अडीच पट दराने मोबदला आकारला जावा, यासंदर्भात महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
भद्रकालीतील सिटी सर्वे क्रमांक १७७९ मधील ६०० चौ.मी. जागा महावितरणने ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता महापालिकेकडून मागितली होती. त्याचबरोबर या ६७ आर जागेपैकी ४० आर जागा ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारणीसाठी मालकी हक्काने मिळावी, अशी मागणीदेखील महावितरणकडून महापालिकेकडे प्रस्तावाद्वारे करण्यात आली होती.
ही जागा ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीकरिता अनुज्ञेय असल्याचा अभिप्राय नगरनियोजन विभागाने दिल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव मिळकत विभागाने महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतील कलमांनुसार या जागेचा मोबदला घेऊन ती महावितरणच्या ताब्यात देणे शक्य आहे. यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत चर्चा झाली. भूसंपादन कायद्यानुसार रेडीरेकनरच्या २.२५ पट मोबदला रक्कम निश्चित करून खरेदीने ही जागा महावितरणला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि भूसंपादन अधिनियमानुसार २.२५ पट दराने नव्हे, तर मूळ रेडीरेकनर दराने जागा खरेदीस महावितरणने तयारी दर्शविली आहे.
शासनाकडून मार्गदर्शन मागविले
ही जागा भूसंपादन अधिनियमानुसार २.२५ दराने द्यावी की, रेडीरेकनर दराने यासंदर्भात महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम तातडीने करावयाचे असल्यामुळे शासन मंजुरीच्या अधिन राहून या जागेचा आगाऊ ताबा महावितरणला देण्यास महासभेने मंजुरी दिली आहे.