नाशिक: ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरनंतर शेअरबाजारातील गुंतवणूक कमी होणार, अशी भिती असताना शेअरबाजारातील गुंतवणूकीने जुलैमध्ये गरुडझेप घेतली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी) ने ११ ऑगस्टला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत तब्बल ८१.०४ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आणि जूनमधील गुंतवणुकीच्या २३,५८७.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत ती ४२,७०२.३५ कोटी रुपयांवर झेपावली आहे. म्युच्यूअल फंडांतील एकूण निधी आता ७५ लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे.
म्युच्युअल फंडांच्या एसआयपी नोंदणींची संख्या ६८.६९ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे एसआयपीअंतर्गत एकूण मालमत्ता १५.१९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. जुलैत मासिक एसआयपीची रक्कम २८,४६४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यात ९.११ कोटी खात्यांचा समावेश आहे.
जुलैमध्ये स्मॉल कॅप फंडांमधील गुंतवणूकीची रक्कम ६,४८४ कोटींवर पोहोचली. जूनमध्ये ती ४,०२४ कोटी रुपये होती. त्याचप्रमाणे, मिड कॅप फंडांमधील गुंतवणूक ५,१८२ कोटी रुपयांवर झेपावली आहे. जूनमधील गुंतवणुकीपेक्षा ती ३८ टक्के अधिक आहे. जुलैमध्ये लार्ज कॅप फंडांमधील गुंतवणूक २,१२५ कोटी रुपये इतकी नोंदविली गेली असून जूनमधील गुंतवणुकीपेक्षा २५ टक्के अधिक आहे.
हायब्रिड फंड्स हा मल्टी ॲसेट अलोकेशन फंड्स गटात समाविष्ट आहे. जूनमध्ये या फंडात ३,२१० कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. त्यातुलनेत जुलैतील गुंतवणूक ६,१९७ कोटी रुपयांवर झेपावली. डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड्समध्ये जुलैमध्ये २,६११ कोटींची गुंतवणूक झाली आहे. जूनमध्ये या फंडात १,८८५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तथापि, आर्बिट्रेज फंड्समध्ये १५,५८४ कोटी रुपयांच्या तुलनेत ७,२९५ कोटी रुपयांची आवक झाल्याचे ॲम्फीच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जुलै महिन्यात विविध श्रेणींमध्ये ३० नवीन फंड योजना सुरू करण्यात आल्या. या योजनांच्या माध्यमातून ३०,४१६ कोटी रुपयांचा निधी आला. १० इक्विटी योजनांतून ८,९९७ कोटी रुपये, ५ डेट योजनांतून १८,९४८ कोटी रुपये, दोन हायब्रिड योजनांतून १,८८७ कोटी आणि इतर सहा योजनांतून ५८४ कोटी रुपयांचा निधी उभारला गेला. यातून भारतीय गुंतवणूकदारांचा भारतीय शेअरबाजारावरील विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
"लार्ज कॅप ते फ्लेक्सी कॅप ते स्मॉल कॅप अशा श्रेणींमध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे, थीमॅटिक आणि लार्ज अँड मिडकॅपसारख्या इतर श्रेणींमध्येही खूप चांगली वाढ दिसून आली आहे. भारतीय गुंतवणूकदार परिपक्व झाले असून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ते इक्विटीवर भर देत आहेत. दीर्घकाळासाठी भारतीय भांडवली बाजारांवर गाढ विश्वास हे या मोठ्या वाढीचे प्रमुख कारण दिसत आहे."अखिल चतुर्वेदी, कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी, मोतीलाल ओसवाल एएमसी
बडोदा बीएनपी परिबाने गुंतवणूकदारांसाठी बडोदा बीएनपी परिबा गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड (एफओएफ) आलेल्या योजनेल जोरदार प्रतिसाद लाभला आहे. सोन्याशी संबंधित मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सोपा, कमी खर्चिक आणि व्यवहार्य गुंतवणूक पर्याय या फंडामुळे मिळाला आहे. हा फंड ४ ऑगस्टला खुला झाला असून येत्या १४ ऑगस्टला बंद होत आहे. गुंतवणूकदारांना हा फंड उच्च तरलता प्रदान करतो.
दीर्घकालीन भांडवल वाढीची क्षमता असलेल्या सोन्यामध्ये स्मार्ट पध्दतीने, तसेच अल्प अस्थिरतेच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी प्रामुख्याने हा फंड तयार करण्यात आलेला आहे. वाटपाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत युनिट्सची विक्री केल्यास किंवा स्विच आउट केल्यास १ टक्का निर्गमन शूल्क (एक्झिट लोड) लागू होणार आहे. १५ दिवसांनंतर विक्री केल्यास अथवा स्विच आऊटवर कोणतेही निर्गमन शूल्क गुंतवणूकदारांना द्यावे लागणार नाही. या वैशिष्टांमुळे सोनेप्रेमींसाठी हा एक लवचिक आणि सोयीस्कर गुंतवणूक पर्याय ठरला आहे. अवघ्या एक हजार रुपयांपासून सुरू होणारी एकरकमी गुंतवणूक आणि फक्त ५०० रुपयांपासून सुरू होणारी मासिक नियमित गुंतवणूक योजनेतून प्रत्येकाच्या आवाक्यात सोन्याची गुंतवणूक आली आहे.