नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ईपीएस - ९५ पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शनधारकातर्फे आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या पेन्शनविषयक धोरणांचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी यंदाची दिवाळी 'काळी दिवाळी' म्हणून साजरी करण्याची घोषणा करत काळ्या फिती लावून काम करत किमान नऊ हजार रुपये मासिक पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता लागू करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले.
आयुष्यभर विविध उद्योग आणि संस्थांत काम करून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या कामगारांना निवृत्तीनंतर अत्यल्प पेन्शनवर गुजराण करावी लागत असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. अनेकांना दरमहा केवळ एक ते दोन हजार रुपये पेन्शन मिळत आहे.
त्यातच वाढती महागाई, औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत असल्याचा त्यांनी सांगितले. ऑगस्ट २०१४ मधील ई-६०९ ठरावाद्वारे करण्यात आलेले अन्यायकारक बदल रद्द करावेत, अधिक पेन्शनसाठी पात्र सर्व लाभार्थ्यांना लाभ द्यावा, पेन्शनची फेरगणणा करून थकबाकी अदा करावी, पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा द्याव्यात, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
याशिवाय जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून देणे, सार्वजनिक वाहतुकीत प्रवास सवलत आणि निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रुपयांची मदत देण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, एसटी महामंडळाबाट सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन अर्ज पीएफ कार्यालयाकडून स्वीकारले जात नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
प्रशासकीय वादामुळे कर्मचारी दीड वर्षापासून पेन्शनपासून वंचित असल्याचे फेडरेशनने सांगितले. हा प्रश्न ताдіने सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात राजू देसले, शिवाजी ढोबळे, नामदेवराव बोराडे, उत्तमराव आढाव, डी. बी. जोशी यांच्यासह अनेक पेन्शनधारक सहभागी होते.