देवळाली कॅम्प : येथील जुन्या स्टेशनवाडीलगत असलेल्या चौधरी मळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बिबट्याची मादी व दोन बछडे अद्याप मोकाट असल्याने भीतीचे सावट कायम आहे.
15 दिवसांपूर्वी चौधरी मळा, फडोळ मळा, पाळदे मळा, कुंवर मळा या भागांत बिबट्यासह दोन बछडे मुक्त संचार करत असल्याचे स्थानिकांनी पाहिल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मनसे शहराध्यक्ष संदीप चौधरी यांच्यासह नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने पाहणी करून चौधरी मळ्यात पिंजरा लावला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.
सकाळी शेतकरी शेतात काम करण्यासाठी जात असताना पिंजर्यात बिबट्या दिसून आला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. यावेळी लहान मुलांसह नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाचे कर्मचारी पांडुरंग भांगरे, अशोक खानझोडे, सोमनाथ मिंदेकर यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला नाशिक रोपवाटिका येथे रवाना केले.
परिसरात अजूनही दोन बछड्यांसह मादीचा वावर असल्याचा दावा शेतकर्यांनी केला आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी संजय चौधरी, संदीप चौधरी, नंदू फडोळ, आप्पा कुंवर, रवि चौधरी, मयूर चौधरी, नीलेश चौधरी यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
जेरबंद झालेल्या बिबट्या नर जातीचा असून, चार ते पाच वर्षांचा आहे. त्याला रेस्क्यू करून नाशिक येथील वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये नेण्यात आले आहे. ज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व दिसून येत आहे तिथे पिंजरे लावले जात आहेत.अनिल अहिरराव, वनपाल, वनविभाग, नाशिक