Engineer and government contractor who accepted bribe to get housing subsidy money arrested
धुळे : पुढारी वृत्तसेवा घरकुल योजनेचे अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात 20 हजाराची लाच स्वीकारणारा साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंता आणि शासकीय ठेकेदार या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साक्री शहरानजीकच्या शेवाळी फाट्यावर ही कारवाई केली आहे.
तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना मौजे जामदे येथे साक्री पंचायत समिती यांच्याकडुन शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले असुन घरकुलाच्या अनुदानाची काही रक्कम त्यांना मिळाल्यावर त्यांनी घरकुलाचे बांधकाम सूरु केले होते. सुमारे एक महिन्यापूर्वी साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंता मनमोहन राजपुत यांनी अनुदानाचे काही हप्ते अदा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडुन प्रत्येक घरकुल धारकाचे ५ हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपये स्विकारले.
त्यानंतर तक्रारदार यांनी घरकुल धारकांच्या उर्वरीत अनुदानाच्या रकमेची चौकशी करण्याकरीता साक्री पंचायत समिती कार्यालयात जावुन मनमोहन राजपुत यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पुन्हा २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता मनमोहन राजपुत यांनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या घरकुलाचे उर्वरीत अनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्याकरीता तकारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी छापा कारवाईचे नियोजन केले.
यासाठी पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व पद्मावती कलाल तसेच पोहेकॉ राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रितेश चौधरी, पोहेकों सुधीर मोरे या पथकाने साक्री शहरा नजीकच्या शेवाळी फाटा येथे सापळा लावला. यावेळी अभियंता मनमोहन राजपुत यांनी शासकिय ठेकेदार रोहन देवरे यांच्या हस्ते सदर लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले.