नाशिक : तब्बल 15 वर्षांनंतर होत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवर्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी 64 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले आहे.
अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार हिरामण खोसकर, आमदार केवलराम काळे, मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, विनायक माळेकर, माजी आमदार सुनील भुसारा, निर्मला गावित, जे. पी. गावीत, वैभव पिचड, वामन खोसकर यांचा समावेश आहे. दाखल झालेल्या अर्जाची गुरुवारी (दि.16) छाननी करण्यात आली असून सर्व अर्ज मंजूर झाली आहेत. शुक्रवारी (दि. १७) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
माघारीसाठी 31 ऑक्टोबर अंतिम मुदत
आदिवासी विकास महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सन 2010 नंतर होत असलेल्या या निवडणुकीत यंदा विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. नऊ गटांसह दोन महिला राखीव अशा एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 64 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले आहेत. नाशिक गटातून नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक 10 अर्ज महिला राखीव गटातून प्राप्त झालेले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाची निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिंबधक संभाजी निकम, सहायक निवडणूक अधिकारी संतोष बिडवई, वैभव मोरडे यांच्या उपस्थितीत अर्जाची छाननी झाली. यात गोंदिया गटात एका अर्जावर हरकत नोंदविण्यात आली होती. परंतु, त्यावर सुनावणी होऊन तो अर्जही सायंकाळी मंजूर करण्यात आला. शुक्रवार (दि.17 ) पासून माघारीला सुरुवात होईल. माघारीसाठी 31 ऑक्टोबर अंतिम मुदत आहे. 14 नोव्हेंबरला मतदान होणार असून 16 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.