नाशिक

निवडणुकीची रणधुमाळी : ‘शिक्षक’साठी मतदारांचा टक्का वाढणार

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारसंघात शिक्षक मतदारांची संख्या ६४ हजार ८०२ इतकी आहे. तसेच पाच हजार ५३९ शिक्षकांनी पुरवणी यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे दि. ७ जूननंतर प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम यादीत मतदारांचा टक्का वाढलेला पाहायला मिळणार आहे.

अठराव्या लोकसभेच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. देशाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याबाबत मतदारांमध्ये उत्कंठा शिगेला पाेहोचली आहे. लोकसभेचा हा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा रणसंग्राम सुरू झाला आहे. नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुकांची भली मोठी रांग लागलेली आहे. मात्र, सरतेशेवटी विधान परिषदेची पायरी कोण चढणार, हे विभागातील ६५ हजारांहून अधिक शिक्षक मतदारांच्या हाती आहे.

नगरमधून सर्वाधिक अर्ज

विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गतवर्षी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत ६४ हजार ८०२ शिक्षकांची नोंदणी पूर्ण करण्यात आली होती. ही यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पुरवणी यादीत नावनोंदणी सुरू होती. त्यानुसार पुरवणी यादीत नावनोंदणीसाठी शिक्षकांचे पाच हजार ५३९ अर्ज आले. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ३,११५ अर्जांचा समावेश आहे. नाशिकमधून २,१८३, नंदुरबारमधून १०३, धुळ्यातून ८०, तर जळगावमधून केवळ ५८ शिक्षकांनी अर्ज केले. दाखल अर्जांची छाननी प्रशासनामार्फत केली जात आहे.

आजपासून पुन्हा अर्ज भरणा

रविवारच्या सुट्टीमुळे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया थंडावली होती. सोमवारपासून ती पुन्हा सुरु होणार आहे. आतापर्यंत दोघा उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. तसेच एकुण ४३ अर्जांची विक्री झाली आहे. येत्या शुक्रवारी (दि.७) अर्जासाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस विभागीय आयुक्तालयात झुंबड उडणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT