Digital Arrest Cyber Fraud Pudhari
नाशिक

Cyber Fraud | 82 वर्षीय सेवानिवृत्ताची 14.25 लाखांची फसवणूक

Cyber Fraud | सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याची व्हॉट्सअॅप व फोनद्वारे तब्बल १४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव येथे उघडकीस आला.

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

मॅक्सलाइफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी व अधिकारी असल्याचे भासवत ८२ वर्षीय सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याची व्हॉट्सअॅप व फोनद्वारे तब्बल १४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव येथे उघडकीस आला.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी रामराव रामचंद्र कौठे (८२, रा. स्टेशन रोड, लासलगाव) यांना दि. २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत संशयितांनी व्हॉट्सअॅप व फोनद्वारे संपर्क साधला.

संशयितांनी स्वतःला मॅक्सलाइफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी व अधिकारी असल्याचे भासवत फिर्यादीच्या विमा पॉलिसीवर एजंटचे ३० टक्के कमिशन मिळवून देतो, कोरोना काळात कंपनीकडे जमा असलेले १० लाख रुपये परत मिळतील, असे आमिष दाखवले.

एकूण २६ लाख ७१ हजार ७०६ रुपये मिळणार असल्याचे सांगत विविध कारणे पुढे करीत कंपनीच्या नावाने पैसे भरण्यास भाग पाडले होते. या फसवणुकीत संशयित सिमरन, रवि कपूर, गीता बॅनर्जी, विजयसिंग व अनिलकुमार दास यांनी वेगवेगळ्या मोबाइलवरून संपर्क साधत बनावट पावत्या पाठवत विश्वास मिळवला. यात फिर्यादींची एकूण १४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी कॉल, व्हॉट्सअॅप संदेश व आर्थिक आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT